satara | शाळा परिसर व स्कूल बसेस सीसीटीव्हीच्या कक्षेत

नागठाणे, (प्रतिनिधी) – सैनिकांचे गाव म्हणुन देशपातळीवर अपशिंगे (मिलिटरी) गावाचा नावलौकीक आहे. याच गावात ए एस पी कॉन्व्हेंट इंग्लीश मिडीयम शाळा आहे.
या शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा, बसेस व ग्राऊंड परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या दोन वर्षांपासुनच कार्यान्वित केली आहे.
तसेच विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या बसेस ही अत्याधुनीक यंत्रणेने सुसज्ज केल्या असल्याचे मुख्याध्यापिका सुप्रिया निकम यांनी सांगितले.
अपशिंगे येथे ए एस पी शाळेचे नर्सरी ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. सर्व वर्गांमधील एकुण विद्यार्थी संख्या ७५० आहे.
स्थापनेपासुनच इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने शाळेचा चांगला नावलौकीक आहे.
सातारा, पाटण, कोरेगाव अशा तीन तालुक्यांमधील एकूण ५७ गावांमधील विद्यार्थी या शाळेत येतात. तर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आठ स्कूल बस धावत असतात.
एखादी आगळीक चुकूनही घडू नये याची काळजी या शाळेत घेतली जाते. संस्थेचे चेअरमन महेंद्र निकम डोळ्यात तेल घालून विद्यार्थी व कर्मचारी यांच्या बाबत सुरक्षा पहात असतात. त्यामुळेच पालकाचा मोठा विश्वास या शाळेवर असल्याचे सौ. निकम यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, यापूर्वी संस्थेच्या सहा बस होत्या. नुकत्याच नवीन दोन बस ताफ्यात सामील झाल्या आहेत. जुन्या बसेससह त्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
नव्या यंत्रणांमध्ये ‘पॅनिक’ बटण सेन्सर जो एखाद्या मुलीस चुकीचा स्पर्श झाला तर ऑपरेटर रूमला गाडीतूनच संदेश देतो.
तसेच धावत्या बसमधील मुलांचे, चालकाचे व कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष चित्रीकरण होते. बसमध्ये गोंधळ झाल्यास सायरन वाजतो. त्यावेळी संस्था ऑफिसमधून वॉकीटॉकीद्वारे बस कर्मचाऱ्यांशी तात्काळ संपर्क करते.
बसमध्ये आग लागण्याची घटना गृहित धरून त्यासाठी सेन्सरयुक्त आग विझवण्याची यंत्रणा व पाण्याचा फवारा अशा उपाय योजनाही बसमध्ये असल्याचे सौ. निकम यांनी सांगितले.
ग्रामीण भागात असूनही ए एस पी कॉन्व्हेंट शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेव्यवस्थेमध्ये शाळेच्या स्कूल बसमध्ये सर्वात महत्वाची वैशिष्टपूर्ण आर. एफ. आय. डी यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा जी. पी. एस. चा वापर करून संस्था व पालक बसचे लोकेशन रियल टाईम ट्रॅक करू शकतात.
तसेच बसमध्ये आर. एफ. आय. डी यंत्रणेमध्ये छेडछाडप्रुफ डिझाईन व एकत्रित भरलेल्या माहितीमुळे बसमध्ये फक्त अधिकृत प्रवाशांची ओळख करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढवते. यामुळे पालक वर्गामधून समाधान व्यक्त होत असल्याचे चेअरमन महेंद्र निकम यांनी सांगितले.
अत्याधुनिक उपायांमुळे आम्ही निश्चिंत
आमचे पाल्य शाळेत प्रवेशित होताच व बाहेर पडताच विशिष्ट यंत्रणेमुळे पालकांना मेसेज येत आहेत. त्यामुळे उपस्थिती पालकांना अवगत होत आहे.
तसेच जी. पी. एस लोकेशन मुळे पाल्यांना बसमध्ये सोडताना व घ्यायला येताना बसची वाट पहावी लागत नाही.
शाळेचा होमवर्कही मोबाईलद्वारे पालकांना मिळत असल्याने पालकही अवगत होत आहेत. या सर्व सुविधांमुळे आजपर्यंत शाळेत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
त्यामुळे सर्व पालकांच्या वतीने मी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानते. सौ. विद्या घाडगे, अध्यक्षा, सखी सावित्री समिती. ए एस पी कॉन्व्हेंट स्कूल





