Satara | काशीळ, समर्थगाव उपसासिंचनसाठी पाणी आरक्षित

नागठाणे, (प्रतिनिधी)- काशीळ, समर्थगाव उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कराड उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख तथा भाजप नेते मनोजदादा घोरपडे यांनी दिली. यामुळे मनोजदादा यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनोजदादा सातत्याने काम करत आहेत. श्री. घोरपडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत हणबरवाडी, धनगरवाडी पाणी योजना पूर्ण केली.
लवकरच धनगरवाडीच्या पाण्याचे पूजन होणार आहे. तसेच तारळी धरणाचे पाणी कोपर्डे जोड कालव्याद्वारे मसूर व कोपर्डे हवेली विभागासाठी दिले आहे.
लवकरच इंदोली व पाल उपसासिंचन योजना पन्नास मीटर उंचीवरून शंभर मीटर करण्यात येणार आहे. त्याचा सर्व प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहचला आहे. काशीळ उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून .०६३ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
त्यामुळे जवळपास पावणेचारशे हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे. या योजनेचा फायदा काशीळ, अतीत, हरपळवाडी या गावांतील पाणी न मिळणाऱ्या शेतीला होणार आहे.
समर्थगाव (अतीत) उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून .०५८ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या योजनेतून साडेतीनशे हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे.
या योजनेचा फायदा समर्थगाव, अतीत, हरपळवाडी या गावांना होणार आहे. याचबरोबर गणेशवाडी उपसासिंचन योजनेची निविदा लवकरच निघणार असून या माध्यमातून ७९१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
या योजनेचा फायदा गणेशवाडी, करंजोशी, सासपडे या गावांना होणार आहे. सासपडेमधील पन्नास मीटर हेडवरील शेतीसाठी उपयोगात येणार आहे तसेच उरमोडी कॅनॉलवरील क्षेत्रासाठी उपसा करून पाणी देण्यात येणार आहे.
या कामासाठी मनोजदादा घोरपडे यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,
खा. उदयनराजे भोसले, आ. शिेवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कृष्णा खोरे विभागाचे मुख्य अभियंता जयंत शिंदे, अभियंता काशीद, शेडगे यांचे सहकार्य लाभले, असे श्री. घोरपडे यांनी सांगितले.





