बँकॉकमध्ये स्कूल बसला भीषण आग; २५ मुलांचा होरपळून मृत्यू

बँकॉक – बँकॉकमध्ये शालेय सहलीवरून परत जाणाऱ्या एका स्कूल बसला लागलेल्या आगीमध्ये २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. या बसमध्ये ४४ विद्यार्थी होते आणि ही बस उथाइ थानी प्रांतातून बँकॉक शहराकडे जात असताना ही दुर्घटना घडली, असे परिवहन मंत्री सुरिया जंगरुंगरुंगकीट यांनी पत्रकारांना सांगितले.
तर तपासाचे काम अजून संपलेले नसल्यामुळे या दुर्घटनेत नक्की किती जणांचा मृत्यू झाला, याचा आकडा अधिकारी निश्चितपणे सांगू शकले नाहीत. मात्र बचावलेल्या मुलांच्या संख्येच्या आधारे या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला असावा, असे गृहमंत्री अनुतिन चार्नविराकुल यांनी सांगितले.
संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्तानी पडल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. टायर फुटल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या अडथळ्यांना धडकली असावी. त्यामुळे बसने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये पूर्ण जळून गेलेल्या अवस्थेत १० मुलांचे मृतदेह आढळल्याचे बचाव पथकाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





