‘आलेच मी…’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच धरणार लावणीवर ठेका

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. आता पहिल्यांदाच ती ‘देवमाणूस’ या चित्रपटात लावणीवर थिरकताना दिसणार आहे. तिच्या ‘आलेच मी’ या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तिच्या नृत्याला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे.
या लावणीसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला, लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिनं सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. Sai Tamhankar |
लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवं रूप आवडेल, अशी आशा आहे,” असे म्हणत तिने आनंद व्यक्त केला.
पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Sai Tamhankar |
दरम्यान, मराठी आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने काम करणारी अभिनेत्री म्हणून सईची नवी ओळख प्रस्थापित झाली आहे. मराठीतही ती तितक्याच जोमाने काम करताना दिसते. ती ‘देवमाणूस’ चित्रपटाव्यतिरिक्त गुलकंद आणि मटका किंगमध्येही पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती ‘ग्राउंड झीरो’ या चित्रपटात इमरान हशमीसोबत काम करणार आहे.
हेही वाचा:





