Pimpri-Chinchwad : रातराणी अपुरी, बस थांब्यांवर करावी लागते प्रतीक्षा; पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीच्या प्रवासाचा प्रश्न गंभीर,
Pimpri-Chinchwad: औद्योगिक कामगारांसह रेल्वे प्रवाशांची गैरसोय, बससेवा वाढविण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे वेगाने विस्तारलेले औद्योगिक शहर असून, येथे विविध कंपन्या, कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी रात्रपाळीत काम करतात.
मात्र, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास कामावरून घरी परतताना अथवा कामावर जाताना सार्वजनिक वाहतुकीचे पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना ताटकळत थांबावे लागते किंवा अवाच्या सवा भाडे देऊन रिक्षा किंवा कॅबने घरी पोहचावे लागते.
बाहेरच्या गावाहून शहरात मोठ्या संख्येने नागरिक रात्री-अपरात्री येतात. पुणे स्टेशन ते भक्ती-शक्ती अशी रातराणीची सोय असली तरी पुढे घरापर्यंतचा प्रवास कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे रात्रीच्या वेळी बस थांब्यावर अनेकदा नागरिक दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड हे एक औद्योगिक शहर असून रोज मोठ्या संख्येने देशाच्या काना-कोपऱ्यातून नागरिक शहरात येतात. विशेषत: दिवाळीनंतर गावाकडून परतणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रेन, एसटी, खासगी बस रात्री अपरात्री पोहचतात. बहुतेक रेल्वे पुणे स्टेशनला थांबतात. तिथून पीएमपीच्या रातराणी बसने नागरिक निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत पोहचू शकतात.
परंतु तिथून पुढे जाण्यासाठी सकाळपर्यंत वाट पहावी लागते. तसेच तळवडे, भोसरी, चिंचवड, चाकण, पिंपरीच्या औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने लहान-मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये काम चालते. रात्री उशिरा सुटणाऱ्या कामगारांना स्वत:च्या खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
दिवाळीपूर्वी अनेक उद्योगांमध्ये काम अधिक असल्याने कामगारांना ओव्हरटाइम करावा लागत होता. यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत होते. परंतु औद्योगिक परिसरात रात्रीच्या वेळी बस सुविधा नसल्याने महिला कामगारांना ओव्हरटाइम करता येत नाही.
प्रवास काहींची कामाची वेळ संपलेली असते, तर काहींना वेळेवर कामावर पोहोचायचे असते. अशा वेळी रातराणी बससेवा अपुरी पडत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. शहराचा वाढता विस्तार, औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती आणि रात्रीही सुरू असलेली नागरिकांची ये-जा लक्षात घेता रातराणीच्या फेऱ्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या कामगारांपासून ते खासगी आस्थापनांतील कर्मचारी, सुरक्षा रक्षक, हॉटेलमधील कर्मचारी, रुग्णालयांतील सेवक आणि इतर रात्रपाळीतील कामगारांपर्यंत अनेकांना रात्रीच्या प्रवासासाठी परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला दररोज ओला किंवा उबरसारख्या खासगी वाहनांचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. काही वेळा वाहन मिळण्यास विलंब होतो, तर काही प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. दुसरीकडे, परराज्यांतून तसेच दक्षिण भारतातून पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनाही मध्यरात्री किंवा पहाटे शहरातील विविध भागांत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
रेल्वेगाड्यांच्या आगमनाच्या वेळा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या उपलब्धतेत ताळमेळ नसल्यास प्रवाशांना स्थानकाबाहेर बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा प्रश्न केवळ कामगारांपुरता मर्यादित नसून, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा आहे.
उपलब्ध रातराणी बसमार्गांच्या तक्त्यानुसार, कात्रज-मरिआई गेट नवीन बसस्थानक, कात्रज-पुणे स्टेशन मोल्दिना स्टँड, हडपसर गाडीतळ-स्वारगेट, हडपसर गाडीतळ-पुणे स्टेशन सेंट हेलेना स्टँड, पुणे स्टेशन-हडपसर रेल्वे स्थानक-मुंढवा, पुणे स्टेशन-भक्ती शक्ती, पुणे स्टेशन-एनडीए गेट क्रमांक १० आणि पुणे स्टेशन-केसनंद फाटा-वाघोली असे आठ मार्ग नोंदविण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या पाच मार्गांसाठी प्रत्येकी आठ, तर उर्वरित तीन मार्गांसाठी प्रत्येकी सहा फेऱ्यांची नोंद आहे.
प्रत्येक मार्गासमोर एक वेळापत्रक नोंदविलेले आहे. पुणे स्टेशन ते भक्ती शक्ती हा मार्ग पिंपरी-चिंचवडशी थेट संबंधित आहे. मात्र, ही आकडेवारी उपलब्ध मार्गांची असून, शहरातील सध्या सुरू असलेल्या सर्व रातराणी फेऱ्यांची संपूर्ण स्थिती त्यातून स्पष्ट होत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रात्रीच्या प्रवासी मागणीचा स्वतंत्र अभ्यास करून पीएमपीएमएल आणि संबंधित प्रशासनाने बसची संख्या, फेऱ्या व वेळा वाढवाव्यात.
रात्रीच्या रेल्वेगाड्यांच्या वेळांशी बससेवेचा ताळमेळ साधावा, तसेच प्रमुख औद्योगिक क्षेत्रे, रेल्वे स्थानके आणि निवासी भागांना जोडणारी सेवा उपलब्ध करावी. रात्री काम करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारा प्रवास मिळणे ही गरज आहे, त्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून अपेक्षा काय?
– मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
– औद्योगिक क्षेत्रे आणि प्रमुख निवासी भागांना रात्रीच्या बसने जोडावे.
– पुणे रेल्वे स्थानकावरील रात्रीच्या गाड्यांच्या वेळांनुसार बसचे नियोजन करावे.
– कामगार आणि प्रवाशांच्या मागणीनुसार रातराणी मार्गांची संख्या वाढवावी.
– बसची वेळ, मार्ग आणि उपलब्धता यांची माहिती ऑनलाइन तसेच बसस्थानकांवर स्पष्टपणे द्यावी.
– महिलांसह सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
Satara: तरुणाच्या मानसिक छळाला कंटाळून युवतीची आत्महत्या; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल





