आई-वडीलांपासून वाचवा

आंतरजातीय मुलाच्या प्रेम पडलेल्या मुलीची हायकोर्टात याचिका
न्यायालयाकडून गंभीर दखल; आज तातडीने सुनावणी
मुंबई  – आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या 19 वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आम्हाला आई-वडीलांबरोबरच कुटूंबियांकडून जिवितास धोका असल्याने 24 तास पोलीस संरक्षण द्या, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने उद्या तातडीने त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या या मुलीच्या वतीने ऍड. नितीन सातपूते यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने तातडीने दखल घेतली.
पुण्यातील उंबरे गावची 19 वर्षांची मुलगी लॉ अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना कथित निम्न जातीमधील 19 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली. हे प्रेम प्रकरण घरच्यांना समजल्यानंतर आई-वडिलांनी तिला शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉलेजमध्ये जाण्यासही बंदी घातली. एवढ्यावरच कुटूंब थांबले नाही तर पेशाने वकील असलेल्या काकाने संतापाच्या भरात गावढी कट्टा आणून थेट डोक्‍याला लावून धमकावले.

हे प्रेमसंबंध तोडले नाही तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. शिवाय हे प्रेमप्रकरण थांबवले नाही तर मुलाला अपहरण व बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली. अखेर एप्रिलमध्ये मला तामिळनाडू येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

अखेर आपल्या प्रियकराला फोन करून ती स्वखुशीने त्याच्याकडे जाण्याचा आणि तो 21 वर्षाचा झाल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र घराच्या माणसांकडून धमकाण्यात आल्याने संरक्षण मिळावे म्हणून तिने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. ती याचिका न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाच्या आज निर्दशनास आणून देण्यात आली.

मी 19 वर्षांची असल्याने सज्ञान आहे. त्यामुळे मला माझ्या विवाहाचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु, मुलगा निम्न जातीचा असल्याने आई-वडील व काकांचा तीव्र विरोध असून त्यांच्याकडून आम्हा दोघांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत आणि पालकांना कोणतेही गुन्हेगारी कृत्य करण्यापासून रोखा, अशी विनंतीही मुलीने याचिकेत केली आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.