दिल्लीत ‘आप’ने भाकरी फिरवली; सौरभ भारद्वाज यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पंजाब, गुजरात आणि गोव्याबाबतही घेतला मोठा निर्णय

दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोठे निर्णय घेतले आहे. त्यांनी आज (२१ मार्च) माजी आमदार सौरभ भारद्वाज यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी माजी मंत्री गोपाळ राय यांची जागा घेतली आहे. गोपाल राय यांना आता अरविंद केजरीवाल यांनी गुजरातला पाठवले आहे, त्यांना तिथे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे सर्वात महत्त्वाच्या पंजाब राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.
राज्यसभा खासदार संदीप पाठक यांना छत्तीसगडचे प्रभारी, तर पंकज गुप्ता यांना गोव्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे. आपने जम्मू आणि काश्मीरमध्ये मेहराज मलिक यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. ते राज्यातील आपचे एकमेव आणि पहिले आमदार आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाला (आप) अलीकडेच दिल्लीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर पक्षाने हा मोठा बदल केला आहे.
Aam Aadmi Party appoints Saurabh Bharadwaj as the chief of the party’s Delhi unit. Gopal Rai and Pankaj Gupta made incharge of Gujarat and Goa, respectively.
— ANI (@ANI) March 21, 2025
पक्षासमोर पंजाब वाचवण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मनीष सिसोदिया यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सिसोदिया पंजाबमध्ये सक्रिय होते. तथापि, विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपनेही यावर प्रश्न उपस्थित केले. अलिकडेच अरविंद केजरीवाल यांनीही पंजाबला भेट दिली. त्यानंतर पक्षाने सहा मोठे बदल केले आहेत.
सौरभ भारद्वाज विधानसभा निवडणुकीत पराभूत
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सौरभ भारद्वाज यांना पराभवाचा सामना करावा लागला. ग्रेटर कैलाश मतदारसंघातून भाजपच्या शिखा राय यांनी त्यांचा ३१३९ मतांनी पराभव केला. शेवटपर्यंत दोघांमध्ये चुरशीची लढत झाली पण शेवटी सौरभ भारद्वाज निवडणुकीत पराभूत झाले. शिखा राय यांना ४९३७० मते मिळाली तर सौरभ भारद्वाज ४६२३१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर, बाबरपूर मतदारसंघातून गोपाल राय विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या अनिल वशिष्ठ यांना दारुण पराभव दिला होता. तर मनीष सिसोदिया दिल्लीच्या जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक हरले होते.





