Saugata Roy : तृणमूलमध्ये बंडखोरी केलेले खासदार पुन्हा घरवापसीच्या तयारीत? सौगत रॉय यांचा मोठा दावा
तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्ष समर्थित एनडीएमध्ये गेलेले अनेक बंडखोर खासदार आता तिथे अस्वस्थता अनुभवत आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय (Saugata Roy) यांनी केला आहे.

Saugata Roy : तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्ष समर्थित एनडीएमध्ये गेलेले अनेक बंडखोर खासदार आता तिथे अस्वस्थता अनुभवत आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय (Saugata Roy) यांनी केला आहे. यापैकी काही खासदारांशी माझे बोलणे झाले असून, ते तृणमूलमध्ये परत आल्यास ही चांगलीच गोष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी त्यातील काही खासदारांशी चर्चा केली आहे. भाजपच्या सहभागामुळे त्यांना तिथे अजिबात सहज वाटत नाही. कदाचित त्यांच्यावर तिथेच राहण्याचा दबाव किंवा मनात एखादी भीती असू शकते. जर ते तृणमूल काँग्रेसमध्ये परत आले तर ही आनंदाची बाब ठरेल. यासंदर्भात मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही बोललो आहे असे रॉय (Saugata Roy) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जरी त्यांनी या नेत्यांची नावे जाहीर केली नसली, तरी नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे तीन खासदार, अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि यूसुफ पठाण मंगळवारी आयोजित एनडीएच्या मंगल मिलन बैठकीला गैरहजर राहिले होते. या तीन खासदारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात मतभेदांच्या चर्चांना उधाण आले आहे.
एनडीएची सत्ताधारी आघाडी म्हणून झालेली ही पहिलीच बैठक होती, ज्यामध्ये एनसीपीआय पक्षाला आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला तीन खासदार गैरहजर राहिल्यानंतर पक्षाने कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत या सर्व अटकळी फेटाळून लावल्या आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या मते हे तिन्ही खासदार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राहण्यास इच्छुक नाहीत.
शुक्रवारी सौगत रॉय (Saugata Roy) यांनी पुन्हा या विषयावर भाष्य करताना सांगितले, अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि यूसुफ पठाण हे एनडीएमध्ये जाऊ इच्छित नाहीत आणि त्यांना भाजपसोबतही राहायचे नाही, अशी माहिती मला मिळाली आहे. याच कारणामुळे त्यांनी एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. सध्या आमच्यात चर्चा सुरू आहे, पण अजून काहीही अंतिम झालेले नाही.
त्यांनी जेव्हा तृणमूल काँग्रेस सोडली होती, तेव्हा ते भाजपमध्ये जातील असे ठरलेले नव्हते. आता त्यांना आपल्या मतदारसंघातील आणि समाजातील लोकांना उत्तर देणे कठीण जात आहे. सध्या तरी या खासदारांच्या तृणमूल काँग्रेसमधील पुनरागमानाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि दोन्ही बाजूंकडून औपचारिक पुष्टी मिळणे बाकी आहे.





