सौदी अरेबियाने थांबवले निम्मे तेल उत्पादन

दिवसाला 5.7 मिलियन बॅरल उत्पादन कमी होणार

5 टक्के उत्पादन कमी होणार

रियाध – इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने 50 टक्के म्हणजेच निम्मे तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्‍याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या अरामको कंपनीच्या दोन क्षेत्र बॉम्ब वर्षावाने हादरली. शनिवारी इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस या दोन ठिकाणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोनमधून हल्ले केले. या हल्ल्‌यानंतर दोन्ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. दरम्यान, अरामकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्‌यानंतर सौदी अरेबियाने निम्मे तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी सरकारच्या या निर्णयामुळे जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला 5.7 मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे 159 लिटर) म्हणजेच 5 टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला 9.85 मिलियन बॅरल होते.

दरम्यान, अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा 50 टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी दिली आहे.

दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्‌यात कोणीही जखमी झालेले नाही. आपतकालीन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या 48 तासांत पुढील माहिती दिली जाईल, अशी माहिती अरामकोचे अध्यक्ष आणि कार्यकारी मुख्याधिकारी अमिन नासेर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.