दुबई – सौदी अरेबियाने येमेनमधील मुकाल्ला बंदरावर मंगळवारी बॉम्बफेक केली. संयुक्त अरब अमिरातीकडून येमेनमधील फुटिरतावाद्यांसाठी शस्त्रे जहाजांमधून पाठवण्यात आल्याचा दावा करत सौदीने हा बॉम्ब हल्ला केला. युएईच्या पूर्वेकडील फुजिराह या बंदरातून एक जहाज आल्याचे समजल्यानंतर हा हल्ला झाला. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी ट्रॅकिंग सिस्टीम बंद केली होती आणि जहाजावरून साऊदर्न ट्रान्झिशनल कौन्सिलच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि मालवाहतुकीची वाहने उतरवण्यात आली, असे सौदीने म्हटले आहे. सौदी अरेबियाने केलेल्या या आरोपावर संयुक्त अरब अमिरातीकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. येमेनमधील साऊदर्न ट्रान्सझिशनल कौन्सिल या बंडखोरांच्या गटाला युएईचा पाठिंबा आहे, असा सौदीचा आरोप आहे. तर येमेनमधील आघाडी सरकारला सौदीचा पाठिंबा आहे. परस्पर विरोधी गटांना सौदी आणि युएईकडून पाठिंबा मिळत असल्यामुळे दोन्ही देश पुन्हा आमने सामने आले आहेत. सौदीने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर येमेनमधील हौथी विरोधी सुरक्षा दलांनी आणिबाणीची घोषणा केली. हौथींच्या ताब्यात असलेल्या सर्व सीमा ७२ तासांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय येमेनमधील सर्व विमानतळ आणि बंदरांवरील वाहतूक देखीलथांबवण्यात आली आहे. येथून केवळ सौदीला जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.