बासेल – भारताच्या सात्विक साईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने तांग कियान आणि रेन यू शियांग या चिनी जोडीचा 54 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-19, 24-22 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अशा प्रकारे या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली.
या सुपर सिरीज 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट संपर्कात होती. सात्विक-चिराग यांनी पहिला गेम 21-19 अशा फरकाने जिंकला, परंतु दुसऱ्या गेममध्ये दोन जोड्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तथापि, भारतीय जोडीने अखेरीस 24-22 अशा फरकाने गेम जिंकून विजेतेपदही पटकावले.
या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी कठोर परिश्रमानंतर प्रत्येक सामना जिंकला आहे. तत्पूर्वी, भारतीय जोडीने 54 मिनिटे रंगलेल्या लढतीत जेप्पे बे आणि लासे मोल्हेडे या डॅनिश जोडीचा 15-21, 21-11, 21-14 असा पराभव केला होता. त्याचवेळी उपांत्यपूर्व फेरीतही सात्विक-चिराग यांनी 84 मिनिटे चुरशीचा सामना खेळला. भारताच्या अव्वल जोडीने यापूर्वी ओंग येव सिन आणि तेओ ई यी या मलेशियन जोडीचा 21-19, 17-21, 21-17 असा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
भारताचे उर्वरित खेळाडू या स्पर्धेत आधीच बाहेर पडले होते. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, मिथुन मंजुनाथ आपापल्या लढती गमावून बाद झाले. अशा परिस्थितीत सात्विक-चिरागकडून भारतीयांना आशा लागल्या होत्या. अखेरीस विजेतेपद जिंकूण सात्विक-चिरागने भारतीयांचा विश्वास सार्थ ठरविला.
Asian Kho Kho Championships 2023 : दुहेरी धमाका; भारताच्या दोन्ही संघांनी पटकाविले विजेतेपद
पाचवे वर्ल्ड टूर विजेतेपद
भारतीय जोडीचे हे मोसमातील पहिले विजेतेपद ठरले. या विजयासह सात्विक आणि चिराग यांनी गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील खराब कामगिरीचा वचपा काढला. जिथे त्यांना दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. एकंदरीत 2019 मधील थायलंड ओपन आणि 2018 मधील हैदराबाद ओपन, याशिवाय गेल्या वर्षी इंडिया ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकलेल्या भारतीय जोडीसाठी हे कारकिर्दीतील पाचवे वर्ल्ड टूर विजेतेपद होते. सात्विक आणि चिरागने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.