Satish Wagh Murder case : सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट; पत्नीनेच दिली सुपारी

पुणे : पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं.
सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता.
पत्नीनेच काढला काटा
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी त्यांचीच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रेमप्रकरण होतं. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.मोहिनी वाघ, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव – धाराशिव, अक्षय जवळकर – सुपारी देण्यात आलेला व्यक्ती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.





