‘खोक्या’ला बीड पोलिसांचा दणका; सतिश भोसलेची जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित, प्रस्तावास मंजुरी

बीड : सतिश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. तो एका व्यक्तीला मारहाण करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये तो पैसे उधळताना दिसत आहे. तसेच त्याने आपल्या जातीची खोटी माहिती देऊन भाजपकडून पद देखील मिळवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलीस आणि वनविभागाकडू खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्याच्या घरामध्ये वनविभागाला जनावरांचं सुकलेलं मांस, आणि शिकारीचे साहित्य आढळून आले होते. या प्रकारानंतर सतीश भोसले ६ दिवसापासून फरार होता.
अखेर, खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली असून लवकरच त्याला बीडमध्ये हजर केले जाणार आहे. मात्र, खोक्या बीडमध्ये येण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, आता खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे. त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याला मोठा धक्का बसला आहे.
खोक्या बीड जिल्ह्यातून हद्दपार
खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे.
सतीश भोसलेंचे आणखी कारनामे समोर
दरम्यान, आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक हरणांची शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे, तसेच हरणाची शिकार करायला विरोध केला म्हणून त्याने ढाकणे कुटुंबातील दोघांना बेदम मारहाण केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. तसेच वन वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले वर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याला या प्रकरणात नोटीस देखील देण्यात आली आहे. अतिक्रमण प्रकरणात सात दिवसांच्या आत मालकी हक्क दाखवा, अन्यथा सात दिवसात मालकी हक्क दावा सिद्ध न केल्यास वन विभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे.
खोक्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी
शेवगांव जि. अ.नगर 51/2018 कलम 498 (अ), 304 भादवि
अंमळनेर 303/2020 कलम143,147, 148, 149, 307, 323, 324,504 भादवि सह 4/25 भादवि
नेवासा अ.नगर 130/2021 कलम 143, 144, 147,149,307,506.34 ‘भादवि सह कलम 3.25 भादवि
पाथडी अ.नगर 365/2021 कलम 363 भादवि
अंमळनेर 51/2023 कलम 324,341,323,504,506 भादवि
शिरुर 103/2023 कलम 365 भादवि
शिरुर 54/2025 कलम 118(1), 189(2),190,191(2),115(2) भान्यासं 2023 दि. 05.03.2025
शिरुर 55/2025 कलम 109,115 (2), 117(2),118(1),189(2),190,191(2),191(3), 351(2),351(3),352 भान्यासं 2023 दि.06.03.2025





