Beed Crime News : सतीश ऊर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचे उपोषण; नेमक्या मागण्या काय? घ्या जाणून

बीड : मागील तीन महिन्यांपासून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर जालनामध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हा मारहाण करणारा कार्यकर्ता असल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.
सध्या सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या तुरुंगात असून त्याच्या कुटुंबीयांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. वनविभागाने आमच्या राहत्या घरावर कारवाई करून आम्हाला बेघर केले आहे. त्यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडले असून न्याय मिळावा या मागणीसाठी हे उपोषण केले जात आहे.
सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसलेने वन विभागावर आरोप करत सांगितले की, ‘वनविभागाने आम्हाला रस्त्यावरती आणले. संसार उपयोगी साहित्य नाही तर आमची लेकरं रस्त्यावरती आली. राहायला घर नाही.’ बावी येथील ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांना अटक का होत नाही?, असा सवाल सतीशच्या बायकोने केला आहे.
अमानुषपणे मारहाण तसेच वन्यजीवांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्या याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी ग्लास हाऊस उभे केले होते. याच ग्लास हाऊसवर वनविभागाने बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले. वनविभागाने जी कारवाई केली त्यामुळे भोसले कुटुंब सध्या उघड्यावर पडले आहे.
सतीश भोसले याच्यावर कारवाई झाली ती आम्हाला मान्य आहे. मात्र अनेक वर्षांपासून आमचे या ठिकाणी वास्तव्य आहे. आता आम्हाला राहायला घर नाही त्यामुळे आमचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी भोसले कुटुंबाने करत बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. याबरोबरच ढाकणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल असून त्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘या’ आहेत मागण्या?
- घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा
- गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे
- सतीश भोसले त्याचे तीन भाऊ व वडील यांना गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करावे
- बाल लैंगिक अत्याचार विनयभंग, मारहाण अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा
- पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार थांबवण्यात यावा
- ढाकणे पिता पुत्राला अटक करा





