Satara: सातार्यातील गणेशोत्सवात जिवंत देखाव्यांवर भर
Satara गौरी विसर्जनानंतर गणेशोत्सवातील उत्साहाला उधाण येत असल्याने गणेश मंडळांच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नागरिक मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडूनही विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Satara: शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही जिवंत देखाव्यांची परंपरा कायम राखली आहे. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सन्मान आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे विविध देखावे मंडळांकडून सादर करण्यात आले आहेत.शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जीवंत देखाव्यांची रंगीत तालीम सुरू होती. काही मंडळांनी शुक्रवार पासून देखावे भाविकांसाठी खुले केले आहेत.
गौरी विसर्जनानंतर गणेशोत्सवातील उत्साहाला उधाण येत असल्याने गणेश मंडळांच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नागरिक मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडूनही विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यंदा शहरातील विविध मंडळांचे लक्षवेधी देखावे सादर केले असून यामध्ये सोमवार पेठेतील फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाने ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. सुमारे 17 कलाकारांचा सहभाग असलेल्या या देखाव्याचे सादरीकरण सुमारे 18 मिनिटांचे आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना दिला जाणारा सन्मान आणि सुरक्षिततेचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
शनिवार पेठेतील श्री गजराज गणेशोत्सव मंडळाने ‘रणधुरंधर सरसेनापती प्रतापराव गुजर – वेडात वीर मराठे दौडले सात’ या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात केला आहे. सुमारे 17 मिनिटांच्या या देखाव्यात तब्बल 25 कलाकार सहभागी झाले आहेत.
राजपथावरील मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाने यंदा राजमाता जिजाऊंचे धैर्य आणि शिवबाची बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत बजावलेली भूमिका आणि त्यांच्या संस्कारातून घडलेले शिवचरित्र या विषयावर प्रकाश टाकण्यात येत आहे. समर्थ मंदिर परिसरातील समर्थ गणेशोत्सव मंडळाने ‘मोहिम महिषासूर मर्दिनी’ हा महिला अत्याचाराच्या विषयावरील आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. सुमारे 20 मिनिटांच्या या देखाव्यात 15 कलाकार सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महिला सन्मान आणि महिलांवरील अत्याचाराविरोधातील सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.
शनिवार पेठेतील सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाने ‘मराठी शाळा जगली पाहिजे’ या सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर सुमारे 13 मिनिटांचा जिवंत देखावा सादर केल आहे. या देखाव्यात 12 कलाकार सहभागी असून, राज्यातील मराठी शाळांची सद्यस्थिती, मराठी शिक्षणासमोरील आव्हाने आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे.
जीवंत देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवार पेठेतील बालविकास गणेशोत्सव मंडळाने ‘तिरुपती बालाजी’ हा पौराणिक जिवंत देखावा यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. सुमारे 16 ते 18 मिनिटांच्या या देखाव्यात 60 कलाकारांसह 40 सहकारी सहभागी झाले आहेत. भगवान तिरुपती बालाजी अर्थात श्री व्यंकटेश्वर स्वामी यांच्या उत्पत्तीची कथा या देखाव्याच्या माध्यमातून सादर केली आहे.
सोमवार पेठेतील अजिंक्य गणेशोत्सव मंडळाने अन्न भेसळीवर आधारित जिवंत देखावा मंडळाकडून सादर केला येणार आहे. अन्न भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि या समस्येविरोधातील प्रशासनाची भूमिका या विषयावर देखाव्यातून भाष्य केले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरील पडसादही देखाव्यात दाखवण्यात आले आहेत. गुरुवार पेठेतील श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि प्रेरणादायी इतिहास यावर आधारित जिवंत देखावा मंडळाकडून सादर केला आहे.
आजपासून गर्दी वाढण्याची शक्यता…
गणेशोत्सवातील शेवटच्या टप्प्यात शहरातील विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कुटुंबासह देखावे पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडत असल्याने प्रमुख चौक, पेठा आणि गणेश मंडळांच्या परिसरात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.





