Satara News : मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सातारकरांचा निर्धार

सातारा : सातारा येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये साहित्यप्रेमी सातारकर, साहित्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या संमेलनाचे एकजुटीने देखणे आयोजन करण्याचा निर्धार करण्यात आला.
नियोजनाच्या या पहिल्याच बैठकीमध्ये एक लाख 15 हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. सातारा शहराला 32 वर्षांनंतर साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. यामध्ये सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मसापचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. विनोद कुलकर्णी म्हणाले, सातार्यात 1993 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनानंतर, तब्बल 32 वर्षांनी हा योग पुन्हा जुळून आला आहे. संमेलनाचे नियोजन हे कोणा एकाचे काम नाही. हे सर्व सातारकरांचे संमेलन आहे.
सातार्याचे नाव देशपातळीवर न्यायचे असेल, तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. पुढील दीडशे दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधी संकलनाचे उद्दिष्ट आहे. सातारकरांनी कोणताही मानापमान न बाळगता, या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. हा जगन्नाथाचा रथ एकजुटीने पुढे न्यावा.
बेडकिहाळ म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विनोद कुलकर्णी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. साहित्य मंडळाला विनोद कुलकर्णी यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता मिळाल्याने, परिवर्तनास खर्या अर्थाने सुरुवात झाली.
हे संमेलन यशस्वी करण्याचे व्रत शाहूपुरी शाखेने घेतले आहे. त्या सोहळ्यासाठी आपण कटिबद्ध राहू. सातारा जिल्ह्यातील विस्मरणात गेलेले साहित्यिक, समाजसुधारकंची स्वतंत्र दालने आणि त्यांच्या जन्मगावांपासून साहित्य संमेलनाच्या मांडवापर्यंत ज्योती आणून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे नियोजन मसाप फलटण शाखेने स्वीकारले आहे.
साहित्य संमेलनात आमचा सहभाग राहणार आहे. आपण द्याल ती जबाबदारी पार पाडू, अशी ग्वाही प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, उदय चव्हाण, प्रल्हाद पार्टे, श्रीधर साळुंखे, डॉ. व्ही. एम. भोसले, डॉ. संदीप चौधरी, वसंत शिंदे, सुधीर विसापुरे, पद्माकर पाठकजी, प्राचार्य रमणलाल शहा, अक्षय माने, ताराचंद आवळे, प्रा.डॉ.पी. एन. शिंदे, डॉ. जगन्नाथ भटकर, प्रा. विनायक राऊत, अनुराधा कोल्हापुरे, वैदेही कुलकर्णी यांनी दिली.
साहित्य संमेलनासाठी निधी संकलनाचे उद्दिष्ट पाहता, मसाप पुसेगावच्या शाखेच्यावतीने 99 हजार, रहिमतपूर येथील व्ही. एम. भोसले यांच्याकडून पाच हजार रुपये आणि डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून 11 हजार रुपये निधी जाहीर करण्यात आला.
निधी संकलनासाठी पुन्हा बैठक घेऊन, स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येईल, असे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. मसाप शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशनचे अॅड. चंद्रकांत बेबले, किशोर बेडकिहाळ, सचिन सावंत, वजीर नदाफ, अजित साळुंखे, आर. डी. पाटील, अनिल जठार, सतीश घोरपडे, तुषार महामुलकर उपस्थित होते.





