Satara ZP Election – आक्रमक रणनीती आणि मजबूत प्रचारातून जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. बहुमताचा आकडा ३३ गाठायचा या इराद्याने अपवाद वगळता भाजपने जिल्ह्यात स्वबळावर दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे सध्या शांततेत प्रचार करण्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची रणनीती ठेवली आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांनी इतर सहकाऱ्यांना मिळून भाजपला रोखण्याचा केलेला प्रयत्न सध्या तरी यशस्वी होताना दिसत नाही.जिल्ह्यामध्ये खरी लढत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशीच राहणार आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर अजूनही सावरला नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात उमेदवार देताना भलतीच दमछाक झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिंदे गटाबरोबर काही ठिकाणी एकत्र येत आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. फलटण व माण या पूर्वेकडील दोन तालुक्यांमध्ये शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. दुसरीकडे साजिल्ह्यामध्ये विशेषतः सातारा, कराड उत्तर व दक्षिण तसेच पाटण या मतदारसंघांमध्ये भाजपने जोरदार प्रचार करत ग्रामीण भागात विकासाच्या योजनांच्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. स्थानिक कार्यकारिणीचे रोजचे प्रचार अहवाल प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पोहोचत असून निवडणूक प्रभारी व प्रमुखांना राजकीय रणनीतीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे. अजित पवार पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना कठोर शिस्तीने बाहेरचा मार्ग दाखवला जात आहे. भाजपच्या निष्ठावंतांना अग्निपरीक्षेचा सामना करावा लागत असल्याने उपऱ्या उमेदवारांच्या तुलनेत योग्य वागणूक मिळत नसल्याने अस्वस्थतेचे वातावरण वाढते आहे. असे असले तरी संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे यातून भाजपच्या तंबूमधील अंतस्थ आग फार मोठी होणार नाही याचे डॅमेज कंट्रोल सुद्धा सुरू आहे. रणनीतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये बूथनिहाय मतदार याद्या घेऊन घरटी प्रचारासाठी पोहोचणे तसेच मतदारयाद्यानिहाय मतदारांची गणती आणि याद्यांचे अद्ययावतीकरण हा नगरपालिकेचा फॉर्म्युला भाजपने कायम ठेवला आहे. त्यामुळे कराड उत्तर व दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले व मनोज घोरपडे यांनी प्रचारात आघाडी कायम ठेवली आहे. कराड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर भाजपचेच कडवे आव्हान राहिले आहे. त्यामुळे या माजी मंत्र्यांसाठी सुद्धा अस्तित्वाची लढाई असणार आहे.फलटण तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र आहेत. दोन्ही पक्षांनी जागावाटप करत निवडणूक रणनीती आखली आहे. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेना असे चित्र आहे. रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे यांच्यासाठी सुद्धा ही लढाई प्रतिष्ठेची आहे. वाई मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष आहे. पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांनी महाबळेश्वर, खंडाळा आणि वाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणूक तर दुसरीकडे वाईमध्ये माजी आमदार मदन भोसले यांना पुरेपूर राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. पाटण तालुक्यातही पालकमंत्री शंभूराज देसाई यांना रोखण्यासाठी भाजपने सत्यजित पाटणकर यांना मोठी ताकद दिली आहे. पाटण तालुक्यातील सात गटांसाठी असणारी लढाई ही पाटणकर विरुद्ध देसाई अशी पारंपरिक गटातच होत असून दोन्ही गटांच्या प्रचाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या लढतीमध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी पूर्वेकडून थेट पश्चिमेकडे लक्ष घातल्याने येथे रंगतदार समीकरणे तयार झाली आहेत. सहानुभूतीचा फायदा होणार का ? यशवंत विचारांच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नेहमीच आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर अजित पवार पक्षाने लोकसभेत अपयश पत्करूनही विधानसभेत जोरदार कमबॅक केले होते. महानगरपालिका निवडणुकीमध्ये संमिश्र यश मिळवल्यानंतरही ग्रामीण भागातील जनतेकडून अजित पवार यांना विशेष अपेक्षा होत्या. त्या दृष्टीनेच त्यांनी जिल्ह्यात युतीची रणनीती आखली. भाजपचे वर्चस्व रोखणे हा भाजपेतर पक्षांचा अजेंडा होता. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यातील बैठका बरेच काही सांगून गेल्या. अजित पवार यांच्या अकाली निधनाने बरीचशी समीकरणे बदलली आहेत.जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोरके झाल्याची भावना सतावत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे एकीकरण की स्वतंत्र अस्तित्व या विषयावर बारामतीचे पवार कुटुंबीय सर्व समावेशक चर्चेनंतर निर्णय घेऊ शकतात. तोपर्यंत एकाकी वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उमेदीचे बळ मिळणे आवश्यक आहे. मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्यापुढे सुद्धा जिल्ह्यात आव्हानांचा डोंगर आहे.अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे जी जिल्ह्यात सहानुभूतीची लाट आहे त्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला होईल असा एक तर्क बांधला जात आहे.