महागड्या कोथिंबीरीसह झोंबतेय मिरची

सातारा – पावसामुळे शेतातील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचा परिणाम बाजारातील भाजीपाल्याच्या किरकोळ दरावर झाला आहे. आमटीला चव आणणाऱ्या कोथिंबिरीची आवक कमी झाल्याने मंडईत चार पाच काड्यांच्या जुडीला चक्क वीस रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या पेंडीचा दर रविवारी शंभरावर पोचला होता, तर हिरवी मिरचीही वाढत्या दराने झोंबू लागली आहे.
नेहमीच्या फळभाज्याही २० रुपये किलोच्या दराने विकल्या जात आहेत. गेल्या महिन्यात सुमारे तीन आठवडे सलग पाऊस पडत होता. त्यामुळे भाज्यांच्या वाढीवर परिणाम झाला. तसेच काही शेतकऱ्यांच्या भाज्यांची उगवणच व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सर्वत्र भाज्यांची चणचण भासत आहे. साहजिकच त्यांचे दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्यांची आवक खूपच कमी होत आहे.
चाकवत बाजारात आढळतच नाही, तर तांदळीची भाजीही मिळणे कठीण झाले आहे. घरोघरी चव आमटीला आणणाऱ्या कोथिंबिरीची आवकही नगण्य होत आहे. पावसाळा सुरू होताच किंवा पावसाळ्याच्या मध्यावर भाज्यांच्या दरात नेहमीच वाढ होते. मात्र, यावेळी थोडी जास्तच वाढ झाल्याने मंडई खरेदीचे गणित बिघडले आहे.
शेपूच्या पेंडी २० ते ३० रुपयांना विकली जात आहे. पोकळा तांदळी तर अभावानेच आढळते. मेथीची पेंडी २५ ते ३० रुपये विकली जात आहे. पालेभाज्याप्रमाणेच फळभाज्यांचे दरही वाढले आहेत. घेवडा २० रुपये, तर वाघ्या घेवडा ३० रुपये पावशेरने विकला जात आहे. हिरवी मिरची २५ ते ३० रुपये पावशेर अशी मिळत आहे.





