सातारा – महामार्गाच्या दुभाजकांना वाली कोण?

सातारा – पुणे -बंगळुरु महामार्ग क्रमांक 48 सातारा ते वेळे आणि सातारा ते उंब्रज येथील दुतर्फा सर्व्हिस मार्गावरती व्यावसायिकांनी अनधिकृतपणे रस्ता दुभाजक फोडून काही अपप्रवृत्तींनी वैयक्तिक व्यवसायाच्या वृद्धीसाठी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्यासंबधी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे गांधारीच्या भुमिकेत दिसत आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातारा जिल्हा हा पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये विविध रस्त्यांवरती हॉटेल्स दुकाने स्टॉल हे लावलेले आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायचं काम हे रस्ते विकास प्रशासन तर करत नाही ना असं वारंवार सामान्य माणसाला प्रश्न पडत आहेत. त्याचे कारण वाढे फाटा येथील महामार्ग लगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरती जी अनधिकृतपणे संबंधित हॉटेल मालक, पेट्रोल पंपचालक, दुकानदार तसेच छोटे-मोठे व्यवसायिक रस्ता दुभाजक फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना आढळत आहेत. परंतु सरकारी बाबू याबद्दल का उदासीन आहेत.
सार्वजनिक मालमत्तेचे केल्याबद्दल सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो आणि या गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत कैद व दंडही होऊ शकतो असे असताना महामार्ग पोलीस याकडे का लक्ष देत नाहीत? याचा शोधा घेणे गरजेचे आहे. सदर दुभाजक हे व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या लाभासाठी काढलेले आहेत. या महामार्गावरून जाणारा प्रवासी आपली वाहने मुख्य महामार्गावरतीच थांबवतात. त्यामुळे या मार्गांवरती अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
वास्तविक हे दुभाजक वाहतूक सुरळीत रहावी. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी नियमानुसारच तयार करण्यात आलेले आहे. महामार्गावर सर्वच गाड्या सुसाट वेगाने धावत असतात. अशा वेळी ज्या ज्या ठिकाणी दुभाजक केलेले आहेत. ते फोडल्यानंतर एखादे वाहन दुभाजकातून वळणार असेल तर त्यावेळी अपघाताची दाट शक्यता असते.
दुभाजकानजिक अशा प्रकारचे अपघात घडलेलेही आहेत. मात्र, शासनाने बांधलेले दुभाजक व्यवसायिक फोडून टाकत असताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण किंवा पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्याचा हा प्रकार गंभीर स्वरुपाचा आहे. पण त्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे.
अनेक अपघात घडलेत तरीही….
या सर्व्हिस मार्गांवरून ज्यावेळी वाहने प्रमुख मार्गावरती येतात. त्यावेळी वाहने वेगात असतात. त्यामुळे बरेच अपघात झाले असून लोकांनी आपला जीव गमावला आहे. या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडचे दुभाजक फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा कोण दाखल करणार असा प्रश्न जनसामान्य व प्रवाशांमधून उपस्थित होत आहे ? सातारा ते खंबाटकी बोगदा व उंब्रजपर्यंत महामार्गावर अशा प्रकारे दुभाजक फोडण्यात आलेले असून यावर कडक कारवाई अपेक्षित आहे.





