माण-खटावच्या लोकप्रतिनिधीची हुकूमशाही मोडीत काढू

दहिवडी – माण-खटावच्या लोकप्रतिनिधींची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी दिला. बोराटवाडी, ता. माण येथे महिलांच्या कार्यक्रमाचा बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ आणि आ. जयकुमार गोरे यांच्या दहशतीच्या विरोधात अभय जगताप यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीने दहिवडी तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी सर्व नेत्यांनी आ. गोरे व राज्य सरकारवर टीका केली.
दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरापासून सुरू झालेल्या या मोर्चात आ. गोरे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आ. गोरे व शासनाच्या निषेधाचे फलक मोर्चाते दिसत होते. या मोर्चात ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, दीपक देशमुख, किशोर सोनवणे, विश्वंभर बाबर, डॉ. महेश गुरव, दिलीप तुपे, बाळासाहेब सावंत, बाबासाहेब माने, ऋषीकेश जगताप, माण व खटाव तालुक्यांमधील कार्यकर्ते, विविध गावांचे सरपंच व पदाधिकारी सहभागी झाले होते.
अभय जगताप म्हणाले, फलक फाडण्याच्या कृतीतून लोकप्रतिनिधींनी हुकूमशाहीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. माणचा बिहार होऊ देणार नाही. शिवप्रभूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भ्रष्टाचारी सरकार आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा माज आम्ही उतरवणार आहोत.
प्रभाकर देशमुख म्हणाले, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हे, तर महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. या कृत्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. बोराटवाडीकरांची प्रवृत्ती उद्ध्वस्त करण्याची आहे. म्हणून त्यांनी महिलांच्या कार्यक्रमाचा फलक फाडला. त्यांना लोकशाही मान्य नाही. या प्रवृत्तीला मुसक्या घालण्याचे काम जनता करणार आहे. खोट्या केसेस घालून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रस्त्यावर उतरून आम्ही इशारा दिला आहे. माण-खटावमध्ये परिवर्तन निश्चित आहे.
अनिल देसाई म्हणाले, तुम्ही फलक फाडू शकता, पण विचार नाही. आज तालुक्यात निर्भय वातावरण नाही. हा मोर्चा परिवर्तनाची सुरुवात आहे. विरोधकांच्या पापाची शंभरी भरली आहे. शंभर दिवसांत परिवर्तन अटळ आहे. रणजित देशमुख म्हणाले, इथल्या लोकप्रतिनिधीने फलक फाडण्यापेक्षा आपल्या कामांचा लेखाजोखा द्यावा. आगामी काळात सत्ता बदलणार असल्याचे भान प्रशासनाने ठेवावे.
यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. बदलापूरसह राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची दडपशाही सुरू आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.





