Satara Water Supply: सातारकरांची पाणीकोंडी फुटणार! कास जलवाहिनीचे काम ‘या’ तारखेला होणार पूर्ण; आता २४ तास मिळणार पाणी?
Satara Water Supply: केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील १०२ कोटींचा कास पाणीपुरवठा प्रकल्प अंतिम टप्प्यात; काम पूर्ण करून चाचणी घेण्याचे पालिकेचे आदेश.

Satara Water Supply – केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत १०२.५६ कोटी रुपये खर्चाच्या कासच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण २७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीपैकी केवळ २०० मीटरचे शेवटचे काम शिल्लक असून ते जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य सातारा पालिकेने पाणीपुरवठा विभागाला दिले आहे. त्यानंतर योजनेची चाचणी घेऊन टप्प्याटप्प्याने शहराला मुबलक व अखंडित पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यादृष्टीने लवकरच सुधारित पाणीपुरवठ्याच्या प्रायोगिक चाचण्या सुरू होणार आहेत.
या योजनेमुळे सध्या उपलब्ध असलेले ६ एमएलडी पाणी ३५ एमएलडीपर्यंत वाढणार आहे. शहराला आवश्यक १४ एमएलडी पाणीपुरवठा करून उर्वरित २१ एमएलडी पाणी शाहूनगर, विलासपूर, जगतापवाडी, करंजे तर्फ सातारा, गोडोली, रामराव पवारनगर, इंदिरानगर, झोपडपट्टी परिसर, विसावा नाका, पीरवाडी तसेच सदरबाजारच्या पूर्वेकडील भागाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नवीन जलवाहिनी जुन्या पाइपलाइनला समांतर असून सायफन पद्धतीने अखंडित पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच सांबरवाडी येथे २५ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात असून डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या वेगाचा वापर करून १ मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचाही समावेश या योजनेत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुधारित योजनेचा नवीन डीपी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात साठवण टाक्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर सातारा शहराला संपूर्णपणे कास तलावातील पाणी उपलब्ध होणार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पालिकेला पाणी खरेदी करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील दरमहा सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे.





