Satara Water Cut: साताऱ्यात तब्बल १० टक्के पाणी कपात लागू ! प्रशासनाचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Satara Water Cut: पूर्व भागातील १९ टक्के पावसाची तूट आणि एल निनोचा संभाव्य प्रभाव; जलसंपदा विभागाच्या निर्णयानंतर साताऱ्यात पाणी कपातीचे नियोजन.

Satara Water Cut- ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा वाढत असतानाच साताऱ्यात पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. एल निनोचा संभाव्य प्रभाव, जिल्ह्याच्या पूर्व भागातील पावसाची १९ टक्के तूट आणि जिल्हा प्रशासनाने पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी पाण्याच्या वापरावर घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर पाण्याच्या काटकसरीची वेळ आली आहे. जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सातारा पालिकाही पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्याच्या तयारीत आहे.
शहरातील नऊ झोनमध्ये टप्प्याटप्प्याने पाणी कपातीचे वेळापत्रक लागू होण्याची शक्यता असून, सातारकरांना आगामी काळात पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे. पावसाळ्यात दोन वेळा सांडव्यावरून वाहिलेल्या कास तलावातील पाणीसाठ्याबाबत आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध पाणी पुढील अनेक महिने पुरवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट गाठायचे असेल,
तर साठ्याचा काटेकोर वापर आणि वितरणाचे नियोजन अपरिहार्य ठरणार आहे. त्यामुळे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच शहरात अघोषित पाणी कपातीची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सभापती तथा उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शहाजी वाठारे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.
उपलब्ध पाणीसाठा, वितरणाच्या वेळा, पाण्याच्या टाक्यांमधील उपलब्धता आणि विभागनिहाय पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचा आढावा यावेळी घेण्यात आला. दरम्यान, पाणी कपात लागू झाल्यास नागरिकांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गळती रोखणे, अनावश्यक वापर टाळणे, पाण्याचे समान वितरण करणे आणि नियोजनबद्ध पुरवठा राखणे ही पालिकेची जबाबदारी ठरणार आहे.
केवळ नागरिकांना काटकसरीचे आवाहन करून चालणार नाही, तर पालिकेलाही वितरणातील त्रुटी दूर करून उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र, पाणी कपातीचे नेमके वेळापत्रक कधी जाहीर होणार आणि प्रत्येक झोनला किती पाणी मिळणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.






