Satara : प्रभाग रचनेची केवळ औपचारिकता

सातारा : जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही प्रभाग रचना सात टप्प्यांमध्ये होणार असून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना यापूर्वीच झाली असून त्याच रचना कायम राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकांचे पडघम सुरु झाले आहेत.
सातारा, कराड, मलकापूर, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर या नगरपालिका व मेढा नगरपंचायत यांचा पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला आहे. जुलै 2022 मध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी वगळता अन्य पाच नगरपालिकांचा अंतिम निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता.
परंतु, ओबीसी आरक्षणाविना हा कार्यक्रम जाहीर झाल्याने आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाकडून पुन्हा एकदा नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात सातारा, महाबळेश्वर व पाचगणी या पालकांनी प्रभाग रचना पूर्ण करताना ओबीसी आरक्षणही निश्चित केले होते. आता पुन्हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मलकापूर वगळता अन्य पालिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याने पूर्वीची प्रभाग रचना तशीच राहण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून हेच प्रभाग रचनेचे नकाशे अंतिम होण्याची शक्यता आहे. १७ जून ते 3 जुलै प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, चार ते आठ जुलै प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवणे, प्रभाग रचनेस मान्यता घेणे, 15 ते 21 जुलै प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवणे, 22 ते 31 जुलै हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे व १ ते ७ ऑगस्ट अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवणे व 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेचे अधिसूचना जाहीर करणे, असे हे टप्पे आहेत.





