सादिक सय्यद
पाचगणी – जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरातील सर्जापूर, कळंबे या गावांमध्ये नदीपात्रातून रात्री हजारो ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन केले जात आहे. यावर महसूल प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने अनधिकृत वाळू उपशाला एक प्रकारे हातभारच लावत आहे का? “दो बिघा जमीन’ असलेल्या शेतकऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारत लाखो रुपये दंड आकारणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कारभाराबाबत सर्वसामान्यान नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कुडाळी नदीच्या आसपासच्या पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न या बेकायदा वाळू उपशामुळे उपस्थित होत आहे.
कुडाळी नदीपात्रात सर्जापूर, कुडाळ, कळंबे, बामणोली, सनपाने, कंरदी येथे रात्री वाळू उपसा सुरू असताना, तलाठी आणि मंडलाधिकारी कोठे असतात? 2019 ते 2021 या कालावधीत कुडाळी नदीपात्रातील वाळू उपशाबद्दल तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून किती पंचनामे आतापर्यंत करण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे. महसूल विभागाचे अधिकारी फक्त जुजबी कारवाई करून कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे वाळूमाफियांनी कुडाळी नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे. पर्यावरणाची हानी होत असताना तलाठी, मंडलाधिकारी कोणाचे गाठोड उचलू लागत आहेत, हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
कुडाळ नदीतील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी नदीपात्रात मोठ्या चारी मारण्याची नामी शक्कल लढवून, तत्कालीन तहसीलदार शरद पाटील यांनी वाळूमाफियांना चारीमुंड्या चीत केले होते; परंतु “नवा गडी, नवा कायदा’ याप्रमाणे जावळी तालुक्यातील कुडाळ भागातील बेकायदा वाळू उपशावर कोणतीच कारवाई प्रशासनाकडून होत नाही. सर्जापूर, कळंबे येथील बेकायदा वाळू उपशात कोणाकोणाचे हात बरबटले आहेत, याचा शोध नवीन तहसीलदारांना घ्यावा लागणार आहे.
या बेसुमार वाळू उपशामुळे परिसरातील शेतीवर परिणाम होत आहे. प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याने वाळूमाफिर्यानी उच्छाद मांडला आहे. “मसल’ व “मनी पॉवर’चा वापर होत असून भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी महसूल विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासा
गेल्या कित्येक महिन्यांपासून वाई तालुक्यातून 25 ते 30 डम्पर बेकायदेशीररित्या रोज रात्री कुडाळ परिसरात येऊन वाळू टाकून जातात. या वाळू बेकायदा वाहतुकीचे चित्रीकरण कुडाळच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. ते तपासल्यास या बेकायदा वाळू वाहतुकीचे गांभीर्य पोलीस व महसुल प्रशासनाला पुराव्यानिशी दिसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.