Satara : लोणंद पोलीस ठाण्याकडून दोन सराईत चोरटे जेरबंद

सातारा : ट्रान्सफॉर्मर आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद करुन त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस ठाणे हद्दीत डीपी चोरीचे सत्र सुरू होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे उपअधीक्षक राहुल धस यांनी सपोनि सुशील भोसले यांना डीपी चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी सूचना दिल्या होत्या. . त्याप्रमाणे राहुल धस यांनी लोणंद पोलीस ठाण्याचे डीबी पथक व अंमलदारांचे एक पथक तयार केले. सुशील भोसले यांनी रात्रगस्तीत वाढ करून सोबत विद्युत मंडळाचे वायरमन बरोबर घेतले. संशयितांच्या शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवले. डीपी चोरी संज्या नमन्या पवार आणि आदित्य संज्या पवार दोघे (रा. झणझणे सासवड, माळीबेंद, ता. फलटण) व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे त्यांना समजले.
त्यांच्या घरी सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. संज्या पवार आणि आदित्य पवार यांनी लोणंद पोलीस हद्दीतील डीपीतील तांब्याची तार चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक केल्यानंतर संज्या पवार याने त्याच्या वाटणीला आलेली तांब्याची तार तसेच चोरी केलेल्या चार मोटरसायकली असा 3 लाख 11 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल दिला. तो जप्त करण्यात आला. या दोघांनी सासवड, हिंगणगाव, तरडगाव, पिंपरी बुद्रुक, टाकूबाईची वाडी, निंबोडी, काळज, रावडी आदी गावांतील डीपी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी लोणंद आणि फलटण हद्दीतील डीपी चोरले असल्याबाबतचीही कबुली दिली आहे.
या कारवाईत सुशील भोसले, उपनिरीक्षक विशाल कदम, देवेंद्र पाडवी, दिलीप येळे, विष्णू धुमाळ, नितीन भोसले, रत्नसिंह सोनवलकर, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, रमेश वळवी, अंकुश कोळेकर, सतीश दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.





