सातारा – राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांना मानवंदना

दहिवडी – राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर आणि मावळ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना रायगडावर राजमाता जिजाऊंना आणि नववर्षाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
चंगळवादाकडे झुकलेली युवा पिढी नववर्षाची सुरुवात विविध प्रकारे करते.
या तरुणाईपुढे आदर्श घालून देणारी कृती माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख हे दहा वर्षांपासून करत आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात राजमाता जिजाऊंच्या समाधिस्थळाची स्वच्छता करून, दीपोत्सवाने सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नववर्षाच्या सुरुवातीला रायगडावरील राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. तेथे देशमुख आणि पासलकर यांनी मनोगत व्यक्त केले. तेथून सर्वांनी श्री जगदीश्वराचे दर्शन घेतले. छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेताना सर्व जण भावूक झाले होते. यावेळी दत्तात्रय पासलकर, जितेंद्र साळुंखे, दिलीपराव तुपे, बाळासाहेब पोळ, संतोष देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर इंगळे, सूर्याजीराव जगदाळे, डॉ. महेश माने, संतोष कापसे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तरुणाईने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. संकटांना धीरोदात्तपणे सामोरे जाऊन, त्यावर मात करायची, हा गुण महाराजांकडून घेण्याची गरज आहे. रायगड हे तीर्थक्षेत्र, प्रेरणास्थान आहे. येथे मुलांना घेऊन आले पाहिजे. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे.
– प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त
रायगड पुनर्विकास प्रकल्प प्रगतिपथावर
रायगड विकासाचा प्रकल्प गेली चार वर्षे हाती घेण्यात आला आहे. प्रभाकर देशमुख यांनी तयार केलेल्या विकास आराखड्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. रायगड विकास प्राधिकरण स्थापन करून, कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांना अध्यक्ष करण्यात आले आहे. या माध्यमातून रायगड पुनर्विकास प्रकल्प प्रगतिपथावर आहे.





