Satara Tourism: सातारा बनणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री शंभूराज देसाईंचा मोठा संकल्प
Satara Tourism: महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार व कोयनानगरच्या विकासावर विशेष भर; स्मार्ट पीएचसी आणि माझी शाळा योजनेची देशपातळीवर दखल घेतल्याचे पालकमंत्र्यांचे प्रतिपादन.

Satara Tourism – महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कास पठार, कोयनानगर आणि मुनावळे या पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहेत. सातार्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि सर्व बाबींमध्ये अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प आहे.
पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक तो संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोण समारंभ संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इमामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याने सुरू केलेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि माझी शाळा – आदर्श शाळा योजनांची देशपातळीवर नोंद घेतली गेली आहे.
राज्यातील जलसंधारणाच्या कामांमुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. सातारा जिल्ह्यात उसाच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यासाठी या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि थोर विभूतींचे स्मरण ठेवून युवा पिढीने देशाच्या, राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस विभागामार्फत देण्यात येणार्या उत्कृष्ट सेवा पदक, विविध शाळा व विद्यार्थ्यांचा सत्कार, वीरमाता व वीरपत्नी यांना जमीन वाटप, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. वन विभागाच्या दोन रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मृदा व जलसंधारणाची शपथ व राष्ट्रीय नशामुक्ती प्रतिज्ञाही देण्यात आली.






