Satara News : गुरुमाऊली मठाधिपती नाना महाराज फुके यांचा 70 वा अभिष्टचिंतन सोहळा; कोयनानगर होणार भक्तिमय
आंबेघर येथे पहाटे 5 वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक पार पडणार आहे. त्यानंतर व्यसनमुक्ती चळवळीशी निगडित सेवेकरी व भक्त आपले मनोगत (Satara News) व्यक्त करणार आहेत.

Satara News : (विजय लाड) – आंबेघर-रासाटी, ता. पाटण येथील श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्टच्यावतीने गुरुमाऊली मठाधिपती नाना महाराज फुके यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी, दि. 24 रोजी होणार्या या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेघर येथे पहाटे 5 वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक पार पडणार आहे.
त्यानंतर व्यसनमुक्ती चळवळीशी निगडित सेवेकरी व भक्त आपले मनोगत (Satara News) व्यक्त करणार आहेत. सकाळी 10 वाजता गुरुमाऊलींची महाआरती तसेच मठाधिपती नाना महाराज फुके यांचा पाद्यपूजन सोहळा हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.
दुपारी 12.10 वाजता होणारा अभिष्टचिंतन सोहळा हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असून, यावेळी नाना महाराज फुके यांच्या अध्यात्मिक व समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा (Satara News) आढावा घेत सेवेकरी व भाविक कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 नंतर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्यामुळे कोयनानगर परिसरात श्रद्धा, सेवा आणि समाजप्रबोधनाचा संगम अनुभवायला मिळणार असून, विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सर्व भाविकांनी या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील व्यसनमुक्तीचे ‘आयडॉल’ म्हणून ओळख असलेले स्वामीभक्त तसेच स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नाना महाराज फुके यांचा 70 वा वाढदिवस बुधवारी, दि. 24 उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यसनमुक्ती चळवळीचा घेतलेला आढावा…
कोयनानगर येथील स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नाना महाराज फुके यांनी गत तब्बल 30 वर्षांपासून उभारलेली व्यसनमुक्ती चळवळ आज समाजपरिवर्तनाची प्रभावी जनचळवळ ठरली आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या हजारो लोकांना नाना महाराज फुके यांनी नवजीवन दिले आहे.
त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असून, विस्कळीत झालेल्या संसारांना पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून दिला जाणारा दारू सोडा संसार जोडा, हा थेट आणि मनाला भिडणारा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचला आहे. उपदेशापुरते मर्यादित न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे.
स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार देण्यात येतो. विशेष म्हणजे, दर गुरुवारी व्यसनमुक्तीची ‘मात्रा’ दिली जाते. गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस मानला जात असल्याने यादिवशी उपचार घेणार्यांमध्ये श्रद्धा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता अधिक दृढ होत असल्याचे दिसते.






