सातारा | आधुनिक युगाची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे

वाई – वेगाने बदलत असलेल्या युगात युवा पिढीसमोर अनेक प्रलाभने आहेत. त्यांना बळी पडून एखादा गुन्हा घडल्यास, त्याचे गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे युवा पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे. चुकीच्या घटनांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी मुलींनी कणखर होणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. आधुनिक युगाची आव्हाने पेलण्यासाठी युवक-युवतींनी सक्षम व्हावे, असे आवाहन वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त किसनवीर महाविद्यालयात एनसीसी कॅडेट, विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांनी योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके केली. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, योगशिक्षक धनंजय मलठणे, रामदास राऊत, पी. एस. भिलारे, उपप्राचार्य झांबरे, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. समीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. निरोगी जीवनासाठी नियमित योगासने व प्राणायाम केला पाहिजे. भारतात योग संस्कृती प्राचीन काळापासून चालत आली आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. रामदास राऊत म्हणाले, धकाधकीच्या जीवनात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शैक्षणिक जीवनापासून विविध प्रकारच्या स्पर्धांना तोंड द्यावे लागते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मन खंबीर असावे लागते. मन खंबीर करण्यासाठी नियमित योगासने, व्यायाम करणे आवश्यक आहे. प्राचार्य डॉ. फगरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.





