Satara: ‘तिळगूळ घ्या गोडबोले’ने पटकवला दादा महाराज करंडक
Satara स्पर्धेतील एकांकिकांमधून सामाजिक प्रश्न, मानवी नातेसंबंध, ग्रामीण वास्तव, युवकांचे प्रश्न, बदलती जीवनशैली यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाट्यरसिकांना मोफत प्रवेश होता.

Satara: सातारा नगरपालिकेच्यावतीने झालेल्या प्रतापसिंह तथा दादा महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुणे येथील कलादर्शन व कलाशृंगार यांनी सादर केलेल्या ‘तिळगूळ घ्या गोडबोले’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे रोख 51 हजार रुपयांचे पारितोषिक व करंडक पटकवला. श्री शाहू कलामंदिर येथे उत्साहात आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात झालेल्या स्पर्धेमध्ये राज्यातील 28 संघ सहभागी झाले होते.
कोल्हापूरच्या सोहम प्रॉडक्शनच्या ‘घर घर’ या एकांकिकेने द्वितीय, पनवेल येथील सी. के. ठाकूर कला महाविद्यालयाच्या ‘कीचकवध पुन्हा’ या एकांकिकेने तृतीय, कोल्हापूरच्या डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘ग्वाही’ या एकांकिकेने उत्तेजनार्थ प्रथम, पुणे येथील कलाकार मंडळी निर्मित ‘बात हो ना हो’ या एकांकिकेने उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक मिळवले. सातारा येथील संवाद नाट्यसंस्थोची ‘मेड फॉर इच अदर’ ही स्थानिक विशेष उल्लेखनीय एकांकिका ठरली.
स्पर्धेतील एकांकिकांमधून सामाजिक प्रश्न, मानवी नातेसंबंध, ग्रामीण वास्तव, युवकांचे प्रश्न, बदलती जीवनशैली यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाट्यरसिकांना मोफत प्रवेश होता. स्पर्धेतील सहभागी संघांना नाश्ता, जेवण, रंगमंचावरील साहित्य, प्रकाश व्यवस्था पालिकेकडून मोफत पुरविण्यात आली.
खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक समिती प्रमुख व नगरसेवक शंकर किर्दत, पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक व नगरसेवकांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयेजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. प्रमोद अत्रे, आशीर्वाद मराठे आणि सलीम मुल्ला हे स्पर्धेचे परीक्षक होते. परीक्षक व सातार्यातील रंगकर्मींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. हेरंब जोशी यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा प्रमुख आणि माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी प्रास्ताविक केले. संदीप जंगम यांनी निकालाचे वाचन केले.
स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विनोद रत्ना (तिळगूळ घ्या गोडबोले, प्रथम), प्रमोद पुजारी (घर घर, द्वितीय), प्रणव शेंडगे (कीचकवध पुन्हा, तृतीय), सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमेय राजमाने (तिळगूळ घ्या गोडबोले, प्रथम), अभिषेक हिरेमठ स्वामी (ग्वाही, द्वितीय), प्रमोद पुजारी (घर घर, तृतीय), बद्रिश कट्टी (बात हो ना हो, उत्तेजनार्थ), सर्वोत्कृष्ट अभिनेता – दिव्येश इंदलकर (चित्ता, प्रथम), जितेंद्र माने (कीचकवध पुन्हा. द्वितीय), दीपक माणगावकर (प्रेम की यातना, तृतीय), सुमित सांघमित्र (तिळगूळ घ्या गोडबोले, उत्तेजनार्थ), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शर्वरी लहाने (तिळगूळ घ्या गोडबोले, प्रथम), शांभवी धामणीकर (बात हो ना हो, द्वितीय), अक्षता बारटक्के (ग्वाही, तृतीय), मानसी बोलुरे (नकाब), सायली वल्ली (झिम पोरी झिम), साक्षी कदम (सेक्स ऑन द व्हिला), भूमी कोळी (कीचकवध पुन्हा), सायली कामत (तिळगूळ घ्या गोडबोले, सर्व उत्तेजनार्थ), सर्वोत्कृष्ट बालकलाकार – देवराज गांधी (झिम पोरी झिम, प्रथम), दूर्वा कुंभार (सेक्स अँड व्हिलेज, द्वितीय), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – पार्थ घोरपडे (घर घर, प्रथम), रोहित देशमुख (कीचकवध पुन्हा, द्वितीय), पार्थ घोरपडे (नकाब, तृतीय), सर्वोत्कृष्ट नेपथ्य – सोहम चव्हाण (घर घर, प्रथम), रितूपर्णा कितोनिया/आर्यन अन्सारी (कीचकवध पुन्हा, द्वितीय), ओंकार वडके/महेश चौघुले (ग्वाही, तृतीय), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अखिलेश, सुशांत, पियुष (कीचकवध पुन्हा, प्रथम), परितोष ठाकूर (बात हो ना हो, द्वितीय), अथर्व वाघ (झिम पोरी झिम, तृतीय), सर्वोत्कृष्ट रंगभूषा व वेशभूषा – दीक्षिता पाटील, अनामिका कांबळे, जान्हवी नाळे (कीचकवध पुन्हा, प्रथम), मोहित इंगळे, राहुल तायडे (म्हव उटलाय, द्वितीय), समृद्धी कुलकर्णी (तृतीय), ऋजुता लिमये (झिम पोरी झिम, उत्तेजनार्थ), सर्वोत्कृष्ट नवीन संहिता – राजीव मुळ्ये (किचकवध पुन्हा).





