Satara : ज्यांनी बादलीभर पाणी आणले नाही त्यांनी आमच्यावर बोलू नये

फलटण : धोम बलकवडीचा पहिला प्रस्ताव १९८८ साली सादर केला होता १९९४ साली प्रस्ताव मंजूर करण्यात आला १९९५ साली पूर्ण मान्यता मिळाली त्यानंतर एप्रिल १९९६ साली कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर एका वर्षाने रामराजे यांची नेमणूक कृष्णा खोरे वर करण्यात आली. मग ते कृष्णा खोऱ्याचे जनक कसे ? त्यांचे बंधू माझ्यावर बोलतात, पण ज्यांनी बादलीभर पाणी फलटण तालुक्यासाठी आणलं नाही त्यांनी आमच्यावर बोलू नये, त्यांनी तालुक्यात साधा पाझर तलाव देखील बांधला नाही, अशी टीका माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केली.
नीरेचे पाणी एरव्ही खूपच शांत असते. मात्र, गेल्या काही दिवसात त्याला राजकीय महत्व प्राप्त झाल्याने निरेच्या पाण्याचा खळखळाट वाढला आहे. काल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामराजेंचा अभ्यास नाही म्हणणाऱ्याच्या बुद्धीची कीव येते असे वक्तव्य करत रणजितसिंह यांना आव्हान दिले होते. या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देत माजी खासदार रणजितसिंह यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर कृष्णा खोरेच्या नीरा देवधर ,धोम बलकवडी या धरणांच्या प्रस्तावा पासून आजच्या सध्या स्थिती पर्यतची कागदपत्रे च पत्रकार परिषदेत मांडत तोफ डागली.
रणजितसिंह म्हणाले, रामराजे यांना धरण कोठे आहे माहिती नाही. ते म्हणतात नीरा- देवधर मावळमध्ये आहे. त्यांना धरणाची क्षमता माहिती नाही, त्यांचा खर्चही माहिती नाही. ते म्हणतात नीरा देवधर साठी २८०० कोटी खर्च केला. पण, याची मान्यताच ८०० कोटींची आहे. रामराजे बुद्धिभेद करून पाण्याचे राजकारण करत आहेत, अभ्यास न करता खोटे बोलणे बरोबर नाही.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकरम्हणाले, पूर्वीचे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रद्द करून तो फ्लड डायव्हरशन प्रकल्प या नावाने सुरू आहे पूर्वीच्या प्रकल्पात फलटण ,खंडाळा ,माण साठी खूपच कमी पाणी होते आता त्यात बदल केल्यामुळे ज्यादाचे पाणी मिळणार आहे. नीरा देवधर मधून धोम बलकवडीत पाणी टाकण्याचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे त्या मुळे फलटण तालुक्यसाठी ज्यादाचे ०.९३ टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे.





