सातारा | वडूज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

वडूज, दि. 9 – वडूज, ता. खटाव येथील कर्मवीरनगर, विठ्ठलनगर, समर्थनगर, रेस्ट हाऊस परिसरात चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन घरांमधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी सोमवारी (दि. 8) मध्यरात्री वडूज शहरातील कर्मवीरनगर, विठ्ठलनगर, रेस्ट हाऊस, समर्थनगर येथे सहा ठिकाणी घरफोडी केली. त्यामध्ये दोन घरांचे कडीकोयंडे तोडले. विठ्ठलनगरातील अशोक काटकर यांच्या घराच्या खोलीच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून, त्यांच्या पॅंटच्या खिशातून पाच हजार रुपये रोख, त्यांच्या मुलाची सॅक व कपडे घेऊन चोरटे पसार झाले.
समर्थनगरातील संभाजी जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून 2800 रुपये रोख, दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व एक हजार रुपये किमतीच्या साड्या, असा ऐवज चोरून नेला. याबाबत अशोक काटकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस नाईक शिवाजी खाडे तपास करत आहेत.





