सातारा – महामार्गावर मध्यरात्री ‘बर्निंग’ बसचा थरार; शैक्षणिक सहलीची बस पेटली, जीवितहानी नाही

नागठाणे – पुणे ते बंगळुरू महामार्गावर दि. ३१ जानेवारीच्या मध्यरात्री अडीच वाजता मलकापूर (जि. कोल्हापूर) आगाराची एसटी बस बोरगाव (ता. सातारा) येथील पुलावर जळून खाक झाली. गोगवे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शाळेची शैक्षणिक सहल या बसने गेली होती. रात्री परतीच्या प्रवासात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गोगवे शाळेची शैक्षणिक सहल दि. ३० च्या पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने (एमएच ११ टी ९२८) मार्गस्थ झाली. बसमध्ये तिसरी ते सहावी या वर्गामधील पन्नास मुले मुली व सहा शिक्षक असे ५६ जण प्रवास करत होते. गोगवे येथून प्रतिबालाजी, नारायणपूर, जेजुरी, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, रांजणगाव व देहू- आळंदी असा सहलीचा मार्ग होता. बसचालक आनंदा सुखदेव कोळेकर (रा. सरूड ता. शाहूवाडी) यांनी काल बसमधील मुलं व शिक्षकांसह परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. ही बस मध्यरात्री अडीच वाजता बोरगावच्या पुलावर आली.
त्यानंतर बसने पेट घेतला. त्यांनी तात्काळ मुलं व शिक्षकांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे कटू प्रसंग टळला. त्याचवेळी बोरगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलास पाचारण केले. त्यांनी येऊन ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, बस व सहलीच्या मुलांचे साहित्य जळून खाक झाले. ही माहिती एसटीच्या सातारा कार्यालयास समजल्यानंतर सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचा बर्निंग थरार साधारण एक ते दीड तास चालू होता. सातारा आगाराकडून पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली. साडेतीन वाजता सहलीतील मुलं व शिक्षक गोगवेकडे मार्गस्थ झाले. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात केल्यानंतर बस महामंडळाने आगारात नेली.
चालकाचे प्रसंगावधान व पोलीसांची मदत
बस बोरगाव पुलावर आली तेव्हा चालक काळभोर यांना शंका आली. त्यांनी बसमधून खाली उतरून मागे जाऊन पाहिले. ब्रेकलायनर जळून ज्वाला निघत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ बसमधील आग विझविण्याचा छोटा सिलेंडर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आटोक्यात येणार नाही याची जाणीव होताच मुलांना गाडीबाहेर काढायला सुरुवात केली. बरीच मुलं गाढ झोपेत असल्याने जागी होत नव्हती. त्यांना त्यांनी खांद्यावर घेऊन बाहेर काढले. बसचालक काळभोर, बोरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजाराम निकम व चालक दादा माने यांनी दाखवलेले प्रसंगावधान मोलाचं ठरलं. घटनास्थळी आलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांनी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्धल शाबासकी न देता उलट त्याचीच झापाझापी केली, असे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.





