योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू

पाथर्डी | मुख्यमंत्र्याच्या ज्या महत्वकांक्षी योजना आहेत, त्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असून या योजनांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्वच योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी सालीमठ हे आज तालुका दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण खात्याचे आयुक्त राधाकिसन देवढे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे उपस्थित होते. यावेळी सालीमठ यांनी पालिकेने लाडकी बहीण योजनेसाठी उभारलेल्या कक्षाची पाहणी केली. पालिका कार्यालयाच्या नवीन इमारती संदर्भात माहिती घेत पालिका कार्यालयात आलेल्या वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सर्वांची नावे वयोश्री योजनेत समाविष्ट झाली आहे का, तुम्हाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचे आहे का,अयोध्येला जाण्यास कोण इच्छुक आहे,या योजनेचा लाभ घेतला तर आवश्यक त्या सुविधा तुम्हाला शासनाकडून दिल्या जातील, अशी माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सालीमठ म्हणाले की, ६५ वर्षांच्या व्यक्तींना वयोश्री योजनेचा लाभ अधिक लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्वीपासून सज्ज झाले आहे.
यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस कॅम्प आयोजित केला असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.लाभार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचे काम केले जात आहे. सर्वांचे आधारकार्ड अपडेट केले जात असून, त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात आहे. मी स्वतः शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी भेट दिली असून लोकांना योजना समजावून सांगितली तर त्यांचा योजनेवर विश्वास बसत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात आठ लाख महिला लाभार्थ्यांची नोंदणी आत्तापर्यंत झाल्याचे सांगितले.





