Satara : विकसित कृषि संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा

पुसेगाव : विकसित कृषि संकल्प अभियानमध्ये शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषि विषज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड, कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान जिल्हयात होणार आहे. याचाच एक भाग म्हणून खटावमध्ये आमदार महेश शिंदे अभियानामध्ये सहभाग झाले व शेतकरी, अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
आमदार महेश शिंदे म्हणाले, सर्व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव यांनी घ्यावा व शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. वाढत्या सोयाबीन क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण वापर व शोध लावून सोयाबीन शेती अधिक किफायतशीर करावी.
यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांतकुमार, डॉ. आर. एन. सिंग ,शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय, शिरवळचे प्रा. डॉ .विकास कारंडे, कृषी संशोधन केंद्र, कराडचे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत कांबळे, तालुका कृषी अधिकारी खटाव विक्रम वाघमोडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, निलेश थोरात, विशाल महाजन, दिलीप घोंगडे, तंत्रज्ञान सहाय्यक पवन जोशी, सौ. शुभप्रभा मोहिते, आत्मा विभागाचे तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश खिलारे, कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कालवडेचे विश्वस्त गौरीशंकर कल्याणी व सौ. रोहिणी कल्याणी उपस्थित होते.





