सातारा – अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्काराने शशिकांत म्हमाने सन्मानित

म्हसवड – अहिंसा पतसंस्थेचा विश्व हिंदी दिनानिमित्त श्री सिद्धनाथ हायस्कूलचे शिक्षक श्री शशिकांत म्हमाने यांना अहिंसा आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकास सन्मानित करण्यात आले. दि. 10 जानेवारी विश्व हिंदी दिन साजरा करण्यात येतो. त्या दिवशीच हिंदी विभागात विशेष योगदान असणारे शिक्षक शशिकांत म्हमाने यांना सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव बनसोडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, सिद्धनाथ हायस्कूलचे व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य दासरे, विठ्ठल सजगाने, संतोष देशमुख उपस्थित होते. संतोष देशमुख म्हणाले, म्हमाने सर हे उपक्रमशील शिक्षक असून हिंदी विषयात त्यांनी विविध विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा दिली आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्या विद्यार्थ्यांना त्यांचा मदतीचा हात असतो.
नितिनभाई दोशी म्हणाले, म्हमाने सर हे विद्यार्थी व आपली शाळा यास केंद्रबिंदू मानून काम करणारे शिक्षक आहेत. सिद्धनाथ हायस्कूलमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेस दरवर्षी उच्चांकी विद्यार्थी बसवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विश्व हिंदी दिनानिमित्त एका हिंदी विषय शिकवणार्या शिक्षकास हा पुरस्कार देताना खूप आनंद होत आहे.
विजयराव बनसोडे म्हणाले, भविष्यात म्हमाने यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारकडून ही यथोचित पुरस्कार मिळावेत.
शशिकांत म्हमाने म्हणाले, अहिंसा पतसंस्थेने पुरस्कारासाठी निवड करून सत्कार केला तो माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण असून या पुरस्काराने मी कृतार्थ झालो आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास या पुरस्काराने ऊर्जा मिळाली आहे.
यावेळी पतसंस्थेचे संचालक महावीर होरा, विजय बनगर, बाळासाहेब सरतापे, व्यवस्थापक दीपक मासाळ, अजित गांधी सौ. राणी डोंगरे यांचे सह अहिंसा परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. अक्षय धट यांनी सूत्रसंचालन केले. निरज व्होरा यांनी आभार मानले.





