Satara : म्हसवडमध्ये फुटले माबाइल गेमचे पेव

म्हसवड : म्हसवड शहरात सध्या ऑनलाइन मोबाइल गेमचे पेव फुटले असून या ऑनलाइन गेमद्वारे शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
दोन किंवा त्याहून अधिक भिडू एकमेकांना कोठेही भेटले की त्यांच्यामध्ये लगेचच लुडोचा डाव सुरु होत असून याद्वारे काही जण मात्र भिके कंगाल झाले आहेत. या गेमद्वारे काही जण कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे पोलीसांनीही कानाडोळा केल्याने शहरातील अनेक गल्लीबोळात असे भिडू लुडोचा डाव टाकलेले आढळून येतात.
मोबाइलवर अँपद्वारे हे गेम डाऊनलोड केले जातात. त्यानंतर दोन किंवा त्याहून अधिक जण यामध्ये सहभागी होऊन त्यावर पैशाचा पाऊस पाडला जातो. यामध्ये जो जिंकतो तो हसतो. मात्र, जो हरतो त्याची अवस्था धड सांगता येत नाही, सहनही होत नाही अशी होते. दिवसभर मोबाइलमध्ये डोकं घालून गेम खेळणाऱ्यांच्या डोळ्याला व मानेला त्रास होत असल्याचेही अनेक जण सांगत आहेत. लुडोचा हा प्रकार म्हणजे जुगारच असल्याचे बोलले जात असून यातून हजारो रुपयांची दररोज उलाढाल होत आहे.
लुडो खेळणाऱ्यां भिडूंचे अड्डे कोठे सुरु आहेत याची संपूर्ण माहिती पोलीसांना आहे. मात्र, खेळणारे भिडूही पोलीसांचे भिडू असल्याने ते त्यांच्याकडे आजवर डोळे झाक करीत आले आहेत. त्यामुळे या खेळाचा प्रसार अधिक होऊ लागला आहे.





