प्रभात वृत्तसेवा म्हसवड – आगामी म्हसवड नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जोरदार तयारीला लागली आहे. या निवडणुकीसंदर्भात तसेच १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील अधिकाधिक शिवसैनिकांनी सातारा येथे होणाऱ्या भव्य सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी केले.मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आगामी म्हसवड नगरपालिका निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुलाणी यांनी सांगितले की, मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आगामी निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे.युती धर्माचे पालन करत पक्षनिष्ठा, विकास आणि जनहित हेच निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतील, असे मुलाणी यांनी नमूद केले. तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नावे वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वंभर बाबर, तालुका संघटक अंकुश नलवडे, युवासेना तालुका प्रमुख हणमंत राजगे, शहर प्रमुख वैभव गुरव, अनिल मासाळ, संतोष लोखंडे, सुरेश झगडे, जयकुमार गुंजाणे, प्रेमकुमार बनगर, बंडोपंत मंडले व शिवसैनिक उपस्थित होते.