Satara : …आणि म्हसवडमध्ये अवतरले साक्षात सचिन तेंडुलकर

सातारा : भारतीय क्रिक्रेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी म्हसवड येथे माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलाच्या आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन काल मंगळवारी केले. माणदेशी चॅम्पियनच्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला.
जिल्ह्यातील म्हसवड येथे चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशन संचलित माण देशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनास सचिन तेंडुलकर यांनी पत्नी सौ. अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत भेट दिली. म्हसवड येथे मेगा सिटीत नव्याने तयार केलेल्या आधुनिक स्टेडियमचे उदघाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर क्रीडा संकुलातील मैदानावर क्रीडा प्रशिक्षणासाठी असलेल्या नवोदित खेळाडूंशी सचिन तेंडुलकर यांनी संवाद साधला.
तेंडुलकर कुटुंबीयांनी रस्सीखेचचा आनंद घेतला. सचिन आणि विद्यार्थी तसेच सौ. अंजली, सारा आणि विद्यार्थी अशा दोन संघात रस्सीखेच रंगली होती. क्रिकेट खेळाडूंशीही सचिन यांनी संवाद साधला. सचिन यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू आणि तिथे उपस्थित असणारे सारेच भारावून गेले होते. क्रिकेटमधील देव समोर असल्याने सारे जण त्यांना डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी माण देशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा, माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, विजय सिन्हा, पार्थ सिन्हा माणदेशी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर सचिन म्हसवड येथे आले होते. मात्र. सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांनी कमालीची गुप्तता पाळली होती. फक्त माणदेशी संस्थेशी संबंधित व्यक्तींना म्हसवडच्या मेगासिटी भागात प्रवेश देण्यात आला होता. तरीही काही जणांनी मोबाइलवर स्टेटस ठेवल्यामुळे काही माध्यमांना ही बातमी समजली.
… माणदेशच्या मातीवर
उमटली सचिनची पावले
माण तालुका सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग. चेतना सिन्हा यांनी माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांच्या जगण्यात बदल घडवला. नंतर माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून विधायक काम उभे केले. हे सारे करतानाच माणदेशी चॅम्पियन्स या संस्थेद्वारे खेळाडू तयार करण्याचे काम सुरु केले. प्रभात सिन्हा यांनी या माणदेशी चॅम्पियन्सची जबाबदारी पेलली असून या संस्थेचे अनेक खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. दुष्काळी भागात क्रीडा प्रकाराला मिळणाऱ्या प्रोत्साहनाची जणू सचिन तेंडुलकर यांनी दखलच घेतली आणि त्यामुळे माणदेशच्या मातीवर सचिनची पावले उमटून गेली.





