Satara : सेकंड हॅंड स्मोकिंगने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका

सातारा : फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात.
अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मनोज लोखंडे यांनी केले. सेकंड हॅंड स्मोकिंग (पॅसिव्ह स्मोकिंग) म्हणजे काय आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात याबाबत जनजागृती सुरु असून धूम्रपान न करताही अनेक व्यक्ती कर्करोगाचा बळी पडत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तंबाखू सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. या निमित्ताने या सेकंड हॅंड स्मोकिंग (पॅसिव्ह स्मोकिंग)आणि त्याच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सुरु आहे. सध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.
पॅसिव्ह स्मोकिंगला सेकंड हॅन्ड स्मोकिंग देखील म्हणतात. यामध्ये व्यक्ती थेट धूम्रपान करत नाही. परंतु, दुसऱ्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे त्याला धोका निर्माण होतो. अशामुळे धूम्रपान न करणार्यांमध्ये या धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो. निष्क्रिय धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणे सतत वाढत आहेत.
सेकंड आणि थर्ड हँड स्मोकमधील कार्सिनोजेन्समुळे धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुस, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरसह विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. या विषारी पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाच्या पेशी आणि शरीराच्या इतर भागांमधील डीएनएचं नुकसान होऊन कॅन्सरपेशी तयार होऊ शकतात. यासाठी पूर्वलक्षण आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.





