Satara : तिजोरीतील खडखडाटामुळे लाडकी बहीण योजनेवर संक्रांत

सातारा : राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे सर्वच बाजूने अपयशी ठरत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालंय की काय ते सांगत नाहीत. त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ही लाडक्या बहिणींची फसवणूक आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दरम्यान सध्या काँग्रेसचा संक्रमणाचा काळ असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी संघर्षाची तयारी ठेवून एकदिलाने पक्ष वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा सध्या संक्रमणाचा काळ असून या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांना पक्षासाठी वेळ देऊ शकतील असे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल. जिल्ह्यात काँग्रेस सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. ज्यांना अडचण असेल त्यांनी मला व्यक्तीश: भेटून काही बाबी असतील सांगाव्यात.
राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे सर्वच बाजूने अपयशी ठरत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली लाडकी बहिण योजना बंद करण्यात येणार आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालंय की काय ते सांगत नाहीत. त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. मोदी व फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाचा आणि महाराष्ट्राचा कारभार चार गुजराथी चालवत आहे. राज्यात अंबानी व अदाणी तर देशात कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. मागील शिंदे सरकारने अदानीला मुंबईतील लाखो कोटी रुपयांची हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने दिली आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयाची जमीन देऊन राज्य आज कुठे नेवून ठेवले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, अल्पना यादव, भानुदास माळी, उदयदादा पाटील, रणजितसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील – चिखलीकर, अमरजित कांबळे, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, विश्वंभर बाबर, संदीप माने, संजय तडाखे, जगन्नाथ कुंभार, मनोहर शिंदे, महेंद्र बेडके-सुर्यवंशी, श्रीनिवास पाटील, अशोकराव पाटील, दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, सुरेश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.





