Satara Sangli MLC Election: विधानपरिषदेला साताऱ्यात नवा गेम? महायुतीच्या एकजुटीच्या दाव्याला ‘क्रॉस व्होटिंग’चा सुरुंग?
Satara Sangli MLC Election: भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार उदयनराजे भोसले धैर्यशील कदमांच्या पाठीशी; मात्र घटक पक्षांमधील समन्वय राखण्याचे उमेदवारासमोर आव्हान.

Satara Sangli MLC Election – विधान परिषदेच्या सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात प्रमुख सामना रंगला आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीने एकजुटीचा दावा करत निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला असला तरी जिल्हा परिषद निवडीवेळी घडलेल्या राजकीय गोंधळनाट्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या घटनांबाबत अद्यापही नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीवर प्रभावीपणे फुंकर घालण्यात महायुतीच्या नेतृत्वाला अपेक्षित यश आले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास तासभर झालेल्या चर्चेनंतरही दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर कोणतीही राजकीय माहिती उघड केली नाही. मात्र, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत प्रचाराला अधिक वेग दिला आहे. भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही कदम यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे.
तथापि, महायुतीतील सर्व घटक पक्षांची मते एकत्र ठेवणे हेच कदम यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे. जिल्हा परिषद निवडीवेळी घडलेल्या गोंधळनाट्याचा आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा वचपा काढण्याची संधी काही नाराज सदस्य शोधू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील अस्वस्थता मतदानाच्या दिवशी कितपत परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मित्रपक्षांच्या मतांचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महायुतीतील संभाव्य मतविभाजन आणि नाराजीचा लाभ मिळाल्यास जगताप यांची लढत अधिक मजबूत होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.






