Eknath Shinde : बच्चू कडूंच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विचारणा, एकनाथ शिंदे हसत-हसत म्हणाले….
Eknath Shinde : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना बच्चू कडू यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले.

Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत,” असे मोठं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या वक्तव्यावर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसत हसत मौन बाळगून सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
विदर्भ दौऱ्यादरम्यान बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं. “गेल्या काही दिवसांत आम्ही विदर्भातील अनेक भागांत दौरे केले. लोकांशी संवाद साधला. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेल,” असा दावा त्यांनी केला होता.
यावेळी कडू यांनी शिवसैनिकांना आवाहन करत, “आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी आणि जनतेशी नाळ जोडलेल्या एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचंच आहे,” असेही म्हटले होते. तसेच “एकनाथ शिंदे यांना जितकं डावललं जाईल, तितके ते लोकांच्या मनात अधिक घर करतील. त्यांचं नाव कुठे लिहिलं किंवा नाही लिहिलं, तरी ते जनतेच्या मनातील नेते आहेत,” असेही कडू म्हणाले होते. (Eknath Shinde)
दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना बच्चू कडू यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर शिंदे हसत म्हणाले, “बच्चू कडू नेमकं काय म्हणाले, याची आधी माहिती घेतो आणि मग त्यावर बोलतो.” शिंदे यांच्या या सूचक आणि मिश्कील प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
उदय सामंत म्हणाले… (Eknath Shinde)
बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री पदाबाबतची त्यांची भूमिका ही वैयक्तिक असू शकते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमचीही भावना आहे. जशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी असते, तशीच आमची इच्छा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आहे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले मत
बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारची भूमिका सार्वजनिकपणे मांडण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करायला हवी होती, असे मत व्यक्त केले. तर भाजपमधील काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा फेटाळल्या असून ते महाराष्ट्रातील नेतृत्वातच सक्रिय असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Badlapur News : भरधाव कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रकृती चिंताजनक






