Satara: समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने कार्पोरेट ट्रेनर, मयूर भावे; वसंत व्याख्यानमालेच्या समारोपात व्याख्यान
Satara वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमात समर्थांचा राष्ट्रजागर या विषयावर पुण्याचे मयूर भावे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी श्रीराम नानल उपस्थित होते.

Satara: समर्थ रामदासांनी माणसांच्या मनाची मशागत मनाचे श्लोक द्वारा केली. आत्माराम द्वारे त्यांनी काय त्यागायचं हे सांगितलं. त्यांना निवळ भक्ती मान्य नव्हती ते म्हणत, भक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती. समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने कार्पोरेट ट्रेनर म्हणून शोभतात, असे मत पुण्याचे मयूर भावे यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमात समर्थांचा राष्ट्रजागर या विषयावर पुण्याचे मयूर भावे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी श्रीराम नानल उपस्थित होते.
मयूर भावे आपल्या व्याख्यानात म्हणाले, समर्थ रामदासांनी आपले सर्व आयुष्य राष्ट्रासाठीच दिले. समर्थ दररोज ११०० सूर्यनमस्कार घालत. वक्तशीरपणा हा समर्थांचा राष्ट्रजागर होता. शिवाजी महाराजांचे गुणगान करणारे समर्थ संभाजी महाराजांना वेळप्रसंगी समज देऊन कान उघाडणी देखील करतात. हे धैर्य समर्थांनी दाखवले. रामाव्यतिरिक्त कुणाचेच गुणवर्णन करणार नाही ही समर्थांनी प्रतिज्ञा केली होती. त्याला अपवाद फक्त शिवाजी महाराज होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समर्थ रामदासांबद्दल असे म्हटले होते की रामदास म्हणजे महाराष्ट्राचा मॅझिनी आणि मॅझिनी म्हणजे इटलीचा रामदास.
श्रीराम नानल म्हणाले, समर्थ रामदासांनी आपल्या वाङ्मयातून आणि कृतीतून समाजात आत्मविश्वास संघटन आणि राष्ट्रप्रेम जागवले. त्यांचा मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश केवळ धार्मिक नव्हता तर तो सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महामंत्र होता. परकीय सत्तेखाली खचलेल्या तत्कालीन समाजाला समर्थांनी धैर्य दिले. नानल यांनी ज्ञानविकास मंडळाचे संस्थापक कै. वि.ल. चाफेकर यांच्या कार्याचा गौरव करून प्रसाद चाफेकर आणि त्यांचे सहकारी चाफेकर यांचा वारसा पुढे चालवत आहेत ही भूषणावह गोष्ट आहे असे सांगितले.
मोहन साठे यांनी प्रास्ताविक केले. सौ. सुजाता कानेटकर यांनी पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप केला. अशा प्रकारे कै. श्रीराम अनंत सहस्रबुद्धे आणि कै. सौ. राजश्री श्रीराम सहस्रबुद्धे (मुंबई) यांचे स्मरणार्थ असलेली १३ दिवसीय वसंत व्याख्यानमाला सातारकर रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.




