Satara : रोहित पवारांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये

सातारा : रोहित पवारांची मला किव येते. रावणाला राम म्हणायचे काम ते करत आहेत. नाव राम असले म्हणजे कुणी प्रभू श्रीराम होत नाही. ज्यांचे नाव राम आहे त्यांनी आजपर्यंत शकुनी मामाचीच कामे केली आहेत. रोहित पवार त्यांची वकीली का करत आहेत. सत्तेच्या विरोधात संघर्ष करुनच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत, त्यामुळे सत्तेचे शहाणपण पवारांनी आम्हाला शिकवू नये. लवकरच आणखी काही घडामोडी घडतील आणि आज जे उन्हात आहेत ते लवकरच मांडवाखाली येतील असा इशारा ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिला.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ना. जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणीप्रकरणी वडूज पोलिसांनी चौकशी करताच आ. रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते. ना. गोरे सत्तेचा गैरवापर करुन रामराजेंना त्रास देत असल्याचे पवार म्हणाले होते. सत्ता येते आणि जाते त्यामुळे गोरेंनी विचार करावा असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता. पवारांच्या ट्विटवर प्रतिहल्ला करत ना.
गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राम नाव असले तरी कामे शकुनीसारख्या करणाऱ्या रामराजेंची बाजू घेणाऱ्या रोहित पवारांची किव येते. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहे.
आम्ही त्यात कधीही हस्तक्षेप करत नाही. जे तपासात समोर आले आहे त्याची चौकशी केली जात आहे. ज्यांची चौकशी होतेय त्यांनी स्पष्टीकरण करावे. मी काही केले नाही, मझा आवाज नाही, माझे नाव नाही, माझा सहभाग नाही हे रामराजेंनी सांगावे. रोहित पवार त्यांची वकीली कशासाठी करत आहेत. त्यांनी त्यांचे पहावे. सत्ता आणि संघर्षाबाबत त्यांनी मला शिकवू नये. सत्तेच्या विरोधात संघर्ष करुनच आम्ही उभे राहिलो आहे. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या षडयंत्रात बळी पडून आम्ही खूप दु:ख सोसलय. प्रत्येक संघर्षाच्या छाताडावर उभे राहून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे सत्तेचे आणि संघर्षाचे शहाणपण त्यांनी आम्हाला शिकवू नये.
तपास योग्य दिशेने सुरु
ना. गोरे पुढे म्हणाले, लवकरच आणखी काही घडामोडी घडणार आहेत. आज उन्हात आहेत ते उद्या मांडवाखाली येतील. त्यामुळे पवारांनी फार सोज्वळ गप्पा मारु नयेत. आम्हाला धमक्या तर आजिबात देवू नयेत. कुणी कुणाला कॉल केले, कुणी कॉल करायला सांगितले हे तपासात समोर आले आहे. कुणीही कितीही मोठा असला तरी तरी दोषी असणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तपास योग्य दिशेने सुरु आहे आणि लवकरच त्यातील सत्य बाहेर येईल असेही गोरे शेवटी म्हणाले.





