दिलासा …! 63 मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यांवर अडीच कोटी जमा

सातारा – राज्यात खरीप हंगामात 21 दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडलांमधील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 25 टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका होऊनही विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ होत होती. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना 63 मंडलातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम द्यावी लागली. ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच कोटी जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागांसाठीही ही योजना आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणेतीन लाखांच्या घरात आहे.
खरीप हंगामात 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेकडो मंडले नुकसानभरपाईसाठी पात्र ठरली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी विविध कारणे आहेत. यामधील एक म्हणजे हंगामात प्रतिकूल परिस्थितीत सलग 21 दिवस पावसाचा खंड राहिल्यास त्या मंडलातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम मिळते. जिल्ह्यातील अशा मंडलची संख्या 63 आहे. यामध्ये कराड तालुक्यातील सर्वाधिक 13 मंडले, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव 8, फलटण 7, सातारा तालुका 6, वाई, पाटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी 5, खंडाळ्यातील 3 आणि जावळीतील 2 मंडलांचा समावेश आहे. यामधील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरले आहेत.
जिल्ह्यातील 63 महसूल मंडलात सलग 21 दिवस किंवा त्याहून अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळणार आहे. विमा घेतलेल्या अर्जधारकांची संख्या सुमारे 1 लाख 73 हजार एवढी आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, खरीप कांदा या 9 पिकांसाठी विमा योजना होती.
अग्रिममध्ये सध्या बाजरी, भात, नाचणी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून लाभ मिळत आहे. त्यातच आता सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याबाबत विमा कंपन्या तांत्रिक कारणे देत आहेत. तरीही जिल्हा प्रशासनाकडून सोयाबीन उत्पादकांनाही लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
40 हजार शेतकऱ्यांना साडे सहा कोटी
जिल्ह्यातील सुमारे 40 हजार शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. विमा कंपन्याकडून अग्रिमचे 6 कोटी 45 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यातील अडीच कोटी जमा झाले असल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.





