Satara Rain: साताऱ्याची तुंबई? बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते भाजी मंडईपर्यंत पाणीच पाणी; नागरिकांचा संताप
Satara Rain: महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पहिल्याच पावसात साताऱ्यातील पायाभूत सुविधांची पोलखोल; प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये साचले पाणी.

Satara Rain – यंदा जून महिन्यात दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात सातारा शहरातील पायाभूत सुविधांतील मर्यादा स्पष्टपणे समोर आल्या आहेत. शहरातील अनेक भागांत पाणी तुंबणे, ओढ्यांची सफाई न होणे, गटारे तुंबणे आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. प्रतापसिंह भाजी मंडई परिसरात, विशेषतः मंडईच्या पिछाडीस, पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या असून व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. टीसीपीसी, करंजे परिसरातील ओढ्यात घंटागाडी नियमित फिरकत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे.
त्यामुळे ओढा प्रदूषित झाला असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोडोली जकात नाका, पालवी चौक तसेच रामराव पवारनगर येथे बरेच रस्ते डांबरीकरण नसल्यामुळे तेथे चिखल होऊन दलदल तयार झाली आहे. तसेच मंगळवार पेठ, रामाचा गोट आणि भवानी पेठेतून वाहणाऱ्या ओढ्यांची अद्याप सफाई न झाल्याने मुसळधार पावसात पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदाचा जून महिना बहुतांश कोरडा गेल्याने शहरात नियमित जंतुनाशक फवारणी झालेली नाही. आता पावसाला सुरुवात झाल्याने गटारांवर तातडीने जंतुनाशक फवारणी करणे, गटारांची तोंडे मोकळी करणे आणि साचलेला गाळ काढणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आळूचा खड्डा येथील वाहनतळात राडारोडा टाकून ठेवण्यात आल्याने पहिल्याच पावसात तेथे दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.
नगरपालिकेने बोगदा ते समर्थ मंदिर तसेच माची परिसरातील डोंगर भागातील अनेक वस्त्या दरडप्रवण म्हणून घोषित केल्या असल्या तरी त्या भागातील पुनर्वसन किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्यास या भागात जीवित व वित्तहानीचा धोका निर्माण होऊ शकतो.
आपत्ती व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांची कमतरता
दरवर्षी पावसाळ्यात सातारा नगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला जातो. या कक्षासाठी सुमारे १५ कर्मचारी आणि दोन विभागप्रमुख नियुक्त केले जातात. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुमारे २८ टक्के तूट राहिल्याने पावसाळी कामांचा वेग मंदावला. त्याचबरोबर पालिकेतील अनेक कर्मचारी जनगणना आणि मतदार यादी प्रमाणीकरणाच्या कामात गुंतल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.






