फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आज छापा टाकल्याची माहिती आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यापूर्वीच आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाचे पथक आज बुधवारी पहाटे ६ वाजताच संजीवराजे यांच्या घरी दाखल झाले आणि लगेचच बंगल्यामध्ये आयकर अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली. बंगल्यात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याप्रमाणे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापे पडले आहेत. या कारवाईविषयीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रघुनाथराजे नाईक निंबाळकर आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. संजीवराजे नाईक निंबाळकर येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटले होते. सत्ताधाऱ्यांची साथ सोडल्यानं छापेमारी सुरु आहे का असं वाटत का असे विचारलं असता तसं काही वाटत नाही. प्रक्रियेचा भाग असेल असं वाटतं किंवा असेल सुद्धा तसं काही. कल्पना नाही,असे उत्तर त्यांनी दिले. इतकी वर्षे राजकारणात आहोत, आजोबा देखील मंत्री होते. पण असं कधी घडलं नव्हतं. देशाला लाखो रुपये देणारं कुटुंब होतं. आमचे संस्थान विलीन केलं तेव्हा शासकीय कार्यालये आमच्याच इमारतीत आहेत. लोकशाहीत सामील झालेलं हे घराणं आहे, असं व्हावं हे दुर्दैव आहे, असे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारांबाबत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी ‘कृपया गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, काळजी नसावी.’ अशा आशयाचे सूचक विधान व्हॉट्स ॲप स्टेटसवर लिहिले आहे. दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातील प्रभात रस्त्यावरील बंगल्यातही छापा पडल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत होते. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माझ्या घरावर छापा पडल्याची माहिती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. गोविंद दूधसंस्थेतही (डेअरीवर) छापा पडल्याची माहिती दिली. मी पुण्यात होतो, आता फलटणमध्ये पोहोचलोय. बाहेर थांबलोय, आता जाऊ देतील अशी अपेक्षा आहे. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो, त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, असे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.