सातारा – सफाई कर्मचार्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या

सातारा – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी जिल्ह्यातील सफाई कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. या कर्मचार्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
हाताने मैला उचलणार्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध आणि त्यांच्या पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी झाली. आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, नगर प्रशासनाधिकारी अभिजित बापट आणि जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
व्यंकटेशन म्हणाले, सफाई कामगारांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करावी. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या समस्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत. सफाई कर्मचार्यांच्या काही तक्रारी असल्यास, त्या आयोगाच्या दूरध्वनी क्रमांकावर व संकेतस्थळावर कराव्यात. सफाई कर्मचार्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ देण्यात यावा.
सफाई कामगारांना शिक्षणानुसार बढती देण्यात यावी. सफाई कामगार नगर परिषदांच्या घरांमध्ये रहात आहेत.
ती घरे त्यांच्या नावावर करावीत. ठेका पद्धतीवर काम करणार्या सफाई कर्मचार्यांना कायम करावे, अशा मागण्या आमदार दीपक चव्हाण केल्या. जे सफाई कर्मचारी 35 वर्षांहून अधिक काळ शासकीय निवासस्थानांमध्ये रहात आहेत, त्यांच्या नावावर निवासस्थाने करण्याची कार्यवाही नगर परिषदांनी करावी. सफाई कर्मचार्यांची दरमहा आरोग्य तपासणी करावी. त्यांना अन्य कामे लावू नयेत. ज्या कर्मचार्यांची घरे नाहीत, त्यांना रमाई आवास योजनेतून घरकुले देण्यात येतील, असे डुडी यांनी सांगितले.
कर्मचार्यांना सोयीसुविधा न देणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल. सफाई कर्मचार्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावेत, असे याशनी नागराजन यांनी सांगितले. सफाई कर्मचार्यांचे प्रश्न वेळोवेळी सोडवून, त्यांना सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल अभिजित बापट यांचा व्यंकटेशन यांनी सत्कार केला. विकी खोकर, संजय सोलंकी, अमित सोलंकी यांनी एम. व्यंकटेशन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.





