सातारा – महिलांना दाखले मिळण्याची विभागनिहाय सुविधा करा

सातारा – राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून, त्यासाठी उत्पन्नाचे आणि डोमीसाइल दाखले मिळवण्यासाठी ठिकठिकाणी महिलांची गर्दी होत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा शहरात विभागनिहाय सुविधा केंद्रे सुरू करा. त्या त्या ठिकाणी महिलांना आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध करून द्या, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि तहसीलदार नागेश गायकवाड यांना दिल्या आहेत. त्यानुसार शहरात महिलांच्या सोयीसाठी मंडलनिहाय सुविधा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा तालुका आणि जावळी तालुक्यातही मंडलनिहाय सुविधा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल आदी कागदपत्रे आवश्यक असून, त्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयातील सेतू केंद्र आणि महा-ई-सेवा केंद्रांमध्ये महिलांची तुडुंब गर्दी होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून, कागदपत्रे मिळवण्यासाठी महिला भर पावसात रांगेत उभ्या रहात आहेत. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि लवकरात लवकर कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी सातारा शहरासह तालुका आणि जावळी तालुक्यात विभागनिहाय सुविधा केंद्रे सुरू करण्याची सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रांताधिकारी भोसले, सातारचे तहसीलदार गायकवाड आणि जावळीचे तहसीलदार कोळेकर यांना दिल्या आहेत. या सूचनेवर तातडीने कार्यवाही करत सातारा शहरात विभागनिहाय सुविधा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात करंजे तर्फ, करंजे पेठ, बसप्पा पेठ, रघुनाथपुरा, दरे खुर्द आणि शाहूपुरीसाठी तलाठी कार्यालय, करंजे (जुने संग्रहालय), सदरबझार, खेड आणि पीरवाडीसाठी तलाठी निवास, एसटी स्टँडसमोर, गोडोली, शाहूनगर, कामाठीपुरा आणि विलासपूरसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, चिमणपुरा, व्यंकटपुरा, रामाचा गोट, यादोगोपाळ पेठ, माची पेठ, प्रतापगंज, सदाशिव पेठ, भवानी पेठ यासाठी राजवाडा येथील तलाठी कार्यालय, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, दुर्गा पेठ, केसरकर पेठ आणि राजसपुरा या भागातील महिलांसाठी नगर परिषदेचे छ. शिवाजी सभागृह या ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
सातारा तालुक्यातील गावांमधील तलाठी कार्यालयांमध्ये आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर, आनेवाडी, केळघर, बामणोली आणि मेढा येथे सुविधा केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. महिलांची कोणतीची गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. माता- भगिनींनी गोंधळून, गडबडून जाऊ नये. पावसाचे दिवस असून, कसलीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी. आपल्या भागासाठी सूचित केलेल्या ठिकाणी दाखले उपलब्ध करून दिले जातील. काही अडचण आल्यास ‘सुरुची त जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.





